नगर पालिका क्षेत्र : नगराध्यक्षांची अर्थमंत्र्यांकडे मागणी लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : ग्रामीण शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शासकीय योजनांच्या लाभाप्रमाणेच नगर परिषद क्षेत्रात समाविष्ट होणाऱ्या शेतकऱ्यांनाही शासकीय योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. शेतकऱ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शासनस्तरावरून विविध कृषी विषयक योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या योजनांचा लाभ घेत ग्रामीण भागातील शेतकरी प्रगतीकडे वाटचाल करीत आहेत. परंतु, या योजनांचा लाभ नगर परिषद क्षेत्रातील शेतकरी घेऊ शकत नाहीत. गडचिरोली शहराजवळील ग्रामीण भागाचा नगर परिषदेमध्ये समावेश झाला असल्याने परिसरातील शेकडो पात्र व गरजू शेतकरी शासनाच्या कल्याणकारी योजनांपासून वंचित आहेत. शेतकऱ्यांना योजनांचा लाभ दिल्याचा त्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे न. प. क्षेत्रातील शेतकऱ्यांनाही योजनांचा लाभ देण्यासाठी विशेष तरतूद करण्यात यावी, अशी मागणी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. यावर ना. मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील प्रस्ताव सादर करावा असे मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी खासदार अशोक नेते, नगरसेवक प्रमोद पिपरे उपस्थित होते.
शेतकऱ्यांना योजनांचा लाभ द्या
By admin | Published: May 27, 2017 1:22 AM