गडचिराेली : रब्बी हंगामात लागवड केलेल्या भाजीपाल्याचे उत्पादन निघण्यास सुरुवात झाल्याने बऱ्याच प्रकारचा भाजीपाला स्वस्त झाला आहे. याशिवाय शेवग्याच्या शेंगा सुद्धा बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी १२० ते १३० रुपये प्रतिकिलाेने विक्री केल्या जाणाऱ्या शेवग्याच्या शेंगा आता ६० ते ७० रुपये प्रतिकिलाेने विक्री केल्या जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
शेवग्याच्या शेंगा भाजीसाठी वापरता येतात. तसेच अनेकजण शेवगा मसालासुद्धा तयार करतात. परंतु, अधिक दर राहिल्यास शेवगा मसाल्याची भाजी करणे परवडत नाही. परंतु, आता शेवग्याच्या शेंगाचे दर घसरले आहेत. त्यामुळे चटपटीत असा शेवगा मसाला तयार करण्यासाठी अनेकजण शेंगा खरेदी करून जात असल्याचे दिसून येते. सध्या टोमॅटो व वांग्याचेही दर कमी झाले आहेत. १० ते १५ रुपये प्रतिकिलाे टोमॅटो तसेच २० ते २५ रुपये प्रतिकिलाे वांगी बाजारात मिळत आहेत. विशेष म्हणजे कारले व भेंडीचे दर अद्यापही फारसे घसरले नाही. कारले ५० ते ६० रुपये, तर भेंडी ४० ते ५० रुपये प्रतिकिलाेने विक्री केली जात आहे.
म्हणून शेवगा स्वस्त
गडचिराेली जिल्ह्यात शेवग्याच्या शेंगाचे उत्पादन फारसे हाेत नाही. माेजकेच शेतकरी परसबागेत, तसेच शेताच्या बांधावर शेवग्याचे उत्पादन घेतात. सध्या शेंगाचे उत्पादन निघण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेवग्याच्या शेंगा स्वस्त झाल्याचे दिसून येत आहे.
लिंबाची मागणी अन् भाव दोन्ही वाढले
सध्या विविध प्रकारचे समारंभ सुरू झाल्याने लिंबाची मागणी वाढली आहे. जिल्ह्यात लिंबाचे उत्पादन कमी प्रमाणात हाेत असल्याने बाजारपेठेत आवक कमी हाेते. त्यामुळे अधिक दराने लिंबाची विक्री केली जाते. दहा रुपयांत दाेन नग अशा पद्धतीने विक्री सुरू आहे.
पालेभाज्या महाग
रब्बी हंगामात लागवड केलेल्या पालेभाज्यांचे पीक निघाले. आता शेतकऱ्यांकडे पालेभाज्या शिल्लक नाही. तसेच उन्हाळ्याला सुरुवात झाल्याने अनेकजण आता पालेभाज्या लागवड करीत आहेत.
आम्ही आठवड्यातून अनेक दिवस भाजीपाल्याचा वापर करताे. त्यामुळे भाजीपाला महाग झाला असला तरी खरेदी करावेच लागते. सध्या टोमॅटो व वांगी स्वस्त झाले आहेत. त्यामुळे वांगी खरेदीकडे अधिक कल आमच्या कुटुंबातील सदस्यांचा आहे. भाव पाहूनच खरेदी सुरू आहे.
- सुनीता गजबे, गृहिणी