शालू दंडवते यांचे प्रतिपादन : नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात जुनी नगर पालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देसाईगंज नगर पालिकेत पारदर्शी कारभाराला आपण प्राधान्य देऊ यासोबतच शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी आपला प्रयत्न राहील, असे प्रतिपादन देसाईगंजच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष शालू दंडवते यांनी केले. देसाईगंज नगर पालिकेच्या सभागृहात बुधवारी सकाळी ११ वाजता त्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी आ. क्रिष्णा गजबे, मावळते नगराध्यक्ष श्याम उईके, माजी नगराध्यक्ष किसन नागदेवे, माजी न. प. उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, विद्यमान नगरसेवक दीपक झरकर, रिता ठाकरे, आशा राऊत, करूणा गणवीर, फहमिदा पठाण, मनोज खोब्रागडे, सचिन खरकाटे, अश्विनी कांबळे, किरण रामटेके यांच्यासह पं. स. च्या सभापती प्रीती शंभरकर, माजी नगरसेवक मुरलीधर सुंदरकर, अण्णाजी तुपट, बाळ सकदेवे, नरेश विठ्ठलानी, राजू झरकर, डॉ. विष्णू वैरागडे, चैतनदास विधाते, मुख्याधिकारी तैमूर मुलानी, मुख्य लिपीक दादाजी ढोंगे, कोषाधिकारी हरगोविंद भुरे, नगर विकास विभागाचे जयंत शालिग्राम, मनीष दंडवते आदी उपस्थित होते. याप्रसंगी आ. क्रिष्णा गजबे यांनी शालू दंडवते यांना शुभेच्छा देऊन पालिकेला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. (तालुका प्रतिनिधी) दंडवते १९ व्या नगराध्यक्ष ४देसाईगंज नगर पालिकेची स्थापना ही तत्कालीन चंद्रपूर जिल्ह्यात असतानाच झालेली आहे. २६ आॅगस्ट १९८२ ला गडचिरोली जिल्हा निर्माण झाला. त्यावेळी देसाईगंज नगर पालिका होती. पहिल्यांदाच सर्वसाधारण महिला प्रवर्गातून महिला नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून आल्या आहे. शालू दंडवते या देसाईगंज नगर पालिकेच्या १९ व्या नगराध्यक्ष आहेत व त्यांना एकहाती बहुमतासह सत्ता संपादन करण्यात यश आले आहे. भारतीय जनता पक्षाने सलग दुसऱ्यांदा ही नगर पालिका आपल्या ताब्यात राखली आहे.
पारदर्शी प्रशासनाला प्राधान्य देणार
By admin | Published: December 29, 2016 1:49 AM