आमदारांचे प्रतिपादन : माना समाजातर्फे जत्रा महोत्सववैरागड : ऐतिहासीक वारसा लाभलेल्या गोरजाई मंदिराच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने या मंदिराची दुरवस्था झाली आहे. या मंदिराचा जीर्णोध्दार करून गतवैभव प्राप्त करून दिले जाईल. त्याचबरोबर पुरातत्व विभागाच्या यादीत या मंदिराचा समावेश व्हावा, या दृष्टीने शासनाकडे प्रयत्न केले जाईल, असे प्रतिपादन आमदार क्रिष्णा गजबे यांनी केले. वैरागड येथील गोरजाई मंदिराच्या परिसरात दोन दिवसांची जत्रा आयोजित करण्यात आली आहे. समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माना जमात मंडळाचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न चौधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्य सरिता वाटगुरे, कुसूम रणदिवे, पं.स. सदस्य कविता दडमल, चांगदेव फाये, महादेव नाकाडे, भास्कर बोडणे, सरपंच गौरी सोमनानी, उपसरपंच श्रीराम अहीरकर, ग्रा.पं. सदस्य पांडुरंग बावणकर, सुधा तावेडे, संगिता धनकर, गोरख भानारकर, प्रा. रामराव नारनवरे, जिल्हाध्यक्ष देविदास जांभुळे, प्रा. प्रदीप बोडणे, वामन सावसाकडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष शत्रुघ्न चौधरी म्हणाले की, माना आदिम जमात असून या समाजाचे आरक्षण हा घटनात्मक अधिकार आहे. हा अधिकार नाकारण्याचा डाव रचला जात आहे. तो माना समाजाने हाणून पाडावा. यासाठी समाज बांधवांनी संघटीत होणे काळाची गरज आहे, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रू घोडमारे, संचालन दीपक घोडमारे तर आभार गिरीधर नन्नावरे यांनी मानले. याप्रसंगी माना समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात्रेला चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यातील माना समाजाचे बांधव उपस्थित होते. (वार्ताहर)
गोरजाई मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी प्रयत्न करू
By admin | Published: February 29, 2016 12:54 AM