भारत सरकारच्या उच्च शिक्षण मंत्रालयातर्फे २०१६मध्ये नॅशनल डिजिटल लायब्ररी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक व सर्वसामान्य वाचकांसाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ग्रंथालयातील ग्रंथसंपदा व साहित्य संगणक किंवा मोबाईलवर एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. संपूर्ण भारतात अनेक शैक्षणिक, सामाजिक संस्थांनी आपापल्या स्तरावर एनडीएल क्लबची स्थापना करून विद्यार्थी व संशाेधकांना भारत सरकारच्या या उपक्रमात सामील करून घेत त्याचा फायदा करून दिला आहे. नवीन उपक्रमांच्या अंमलबजावणीत नेहमीच अग्रेसर असलेल्या मुनघाटे महाविद्यालयाने कोरोनाच्या काळात सदर क्लबची स्थापना केली. त्यानंतर लगेच ३२० सभासदांची नोंदणी केली. ग्रंथपाल डॉ. अनिल भोयर यांच्या नेतृत्त्वात सदर क्लबचे काम सुरू झाले आहे, असे प्राचार्य डाॅ. राजाभाऊ मुनघाटे यांनी कळविले.
बाॅक्स
सर्व भाषांतील पुस्तके ऑनलाईन उपलब्ध
महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी हे या क्लबचे सदस्य असून,
महाविद्यालयाने या क्लबव्दारे सर्व भाषेतील सर्व विषयांची पुस्तके ऑनलाईन अवलोकन करण्याची संधी प्राप्त करून दिली आहे. जगातील सर्व वृत्तपत्रे, मासिके घरी बसून हे सर्व सदस्य वाचू शकतात. या क्लबच्या सदस्यांना नॅशनल डिजिटल लायब्ररीच्या माध्यमातून जगातील सर्वच ग्रंथालयांतील साहित्य उपलब्ध झाले आहे. सदर उपक्रमामुळे आदिवासी भागातील विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त करून महाविद्यालय प्रशासनाचे कौतुक केले आहे.