विसोरा : समाजात वाचनाची गोडी वाढावी. गरजूंपर्यंत पुस्तके पोहोचावी. मुळात पुस्तके का वाचावी. कोणती पुस्तके वाचावी. पुस्तके कशी वाचावी यांचा शोध आपणच घेऊन पुस्तकांच्या प्रेमात पडून देशात प्रतिभाशाली व्यक्ती म्हणून जगावे. ज्यामुळे देश, समाज सुधारण्यासाठी आपले योगदान बहुमूल्य होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन आ. कृष्णा गजबे यांनी पोटगाव फेस्टिव्हलमध्ये बुधवारी केले.
फेस्टिव्हलचे उद्घाटन आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते झाले. स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी तसेच गावात युवावर्गाला वाचनाची गोडी लागावी व त्या माध्यमातून युवावर्ग अधिकारी, कर्मचारी व्हावे या उद्देशाने गावातील युवा वर्गांला वाचनालयाचा फायदा झाला आहे. आ.कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नाने गावात मागील पाच ते सहा वर्षांपासून वाचनालय आहे. सुरुवातीला आ.गजबे यांनी येथील राजर्षी शाहू महाराज वाचनालयाला अनेक पुस्तके उपलब्ध करून दिली. तसेच वाचकांना काही पुस्तकांची आवश्यकता असल्या कारणाने पोटगाव फेस्टिव्हलच्या माध्यमातून अनेक पुस्तके भेट दिली. पोटगाव फेस्टिव्हल हे गावातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समूह असून नेहमीच गावातील विविध समस्या दूर करण्याकरिता पुढे असतात. फेस्टिव्हलला शंकर रणदिवे, महिंद्र सोनपिपरे, निरंजन सोनपिपरे, गणपत वाघाडे, अमित शेंडे उपस्थित होते.