बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट १९४९ अंतर्गत देसाईगंज नगरपरिषदेच्या हद्दीत बंसोड मल्टीस्पेशालिटी ऑफ मल्टीपॅथी हॉस्पिटलला दहा बेडचा नर्सिंग होम परवाना मिळणेबाबत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे दि. २१/९/२०१३ ला प्रस्ताव सादर केलेला होता. या प्रस्तावात डॉ. बंसोड (होमिओपॅथी) यांनी आयुर्वेद, बालरोगतज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, वंध्यत्व निवारण तज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ यांच्याशी करारनामे करून त्यांच्या मेडिकल कौन्सिल ऑफ महाराष्ट्रचे रजिस्ट्रेशन नंबर व डिग्री जोडल्या हाेत्या. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने बॉम्बे नर्सिंग होमचा परवाना दिलेला होता.
काेराेना पेशंटवर अवैधरीत्या उपचार करीत असल्याने या रुग्णालयावर २ मे २०२१ राेजी कारवाई करण्यात आली. कारवाईच्यावेळी नर्सिंग होम परवाना मिळणेबाबत सादर केलेल्या प्रस्तावातील डॉ. श्रीकांत बंसोड यांच्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही डॉक्टर आढळून आला नाही. यावरून डाॅ. बंसाेड हे एकटेच सर्व प्रकारच्या रुग्णांवर उपचार करीत असल्याचे दिसून येते.
बाॅक्स
यापूर्वीही उघडकीस आला होता भोंगळ कारभार
शस्त्रक्रिया करणाऱ्या चार खासगी रुग्णालयांकडे शस्त्रक्रिया थिएटरची रीतसर परवानगीच नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते. या यादीत बंसोड हाॅस्पिटलचादेखील समावेश होता. याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला हाेता. १५ मार्च ते १५ एप्रिल २०१७ या कालावधीत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी या चार सदस्यीय समितीने खासगी रुग्णालयांची सखोल चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान बरेच गंभीर तेवढीच धक्कादायक माहिती पुढे आली होती. त्यावेळीदेखील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दुर्लक्ष केले होते हे विशेष.