लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जंगलातील सागवानाची तस्करी करणाऱ्यांना रोखणाऱ्या वनकर्मचाऱ्यांवर दगडफेक करून कुऱ्हाडीने हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना न्यायालयाने जन्मठेप व ९ हजार रुपये प्रत्येकी दंड अशी शिक्षा ठोठावली. राजन्ना पर्वतालू अनमुल्ला व व्यंकटस्वामी मोंडी गोमासे, दोघेही रा. भोगापूर ता.सिरोंचा अशी आरोपींची नावे आहेत.प्राप्त माहितीनुसार, १४ मार्च २०१४ रोजी पहाटे २.३० ते ३ च्या सुमारास आरोपी राजन्ना पर्वतालू अनुमुल्ला, व्यंकटस्वामी गोमासे यांच्यासह इतर काही लोक सागवानी लठ्ठे बैलबंडीमध्ये भरून जात होते. वनाधिकारी व कर्मचार्यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांच्यावर दगडफेक केली. एवढेच नाही तर कुऱ्हाडीने हल्ला करु न जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी वन अधिकाऱ्यांनी आपल्या बचावासाठी हवेत गोळीबार केला. यामुळे आरोपी सैरावैरा पळू लागले. यावेळी एक गोळी बैलाला लागून कुऱ्हाडीने वार करणाऱ्या आरोपीला लागली. यामुळे तो जखमी झाला. आरोपीला रुग्णालयात भरती केले असता त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेत वन अधिकारी डी. के. राघोर्ते यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांनी या घटनेची फिर्याद सिरोंचा ठाण्यात नोंदविली.त्यावरून विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. या प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश संजय मेहरे यांनी स.सरकारी वकील सचिन कुंभारे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरला.
वनकर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या वनतस्करांना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 1:12 AM