सिराेंचा, अंकिसा : सिराेंचा तालुक्यातील आसरअल्ली पाेलिसांनी साेमवारी सकाळी ८ वाजता सापळा रचून जनावरांची तस्करी करणारा ट्रक जप्त केला आहे. या ट्रकमधील २७ जनावरांना यामुळे जीवनदान मिळाले आहे. मात्र, दुर्दैवाने त्यातील १५ जनावरे वाटेतच मरण पावली.
इंद्रावती नदीवर पातागुडमजवळ असलेल्या पुलावरून आसरअल्लीमार्गे हैदराबाद येथे ट्रकने जनावरे नेली जात असल्याची गाेपनीय माहिती आसरअल्ली पाेलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार, आसरअल्ली पाेलीस मदत केंद्राचे पाेलीस उपनिरीक्षक मंदार पुरी यांच्या मार्गदर्शनात सापळा रचण्यात आला. ट्रक अडवून तपासणी केली असता, ट्रकमध्ये ४२ जनावरे आढळून आली. त्यात २४ बैल व ३ गायी जिवंत, तर १३ बैल व २ गायी ट्रकमध्ये मृतावस्थेत आढळून आले. पशुवैद्यकीय अधिकारी, सिराेंचा यांनी मृत जनावरांचे विच्छेदन केले. या प्रकरणी ट्रकचालक ख्वाजा अजमत उल्हा (२६) याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय मंदार पुरी करीत आहेत.