कुरखेडा : गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या १० चाकी ट्रकला कुरखेडा पोलिसांनी पकडून त्यातील ३७ जनावरांना जीवदान दिले. मात्र त्यातील २ जनावरे मरण पावली होती. परिवहन अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेवरून ही कारवाई करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, सकाळी ९ वाजताच्या सुमारास सदर ट्रक (एमएच ३६, एफ ४७८६) गोठणगाव टी पॉईंटकडून कुरखेडाकडे येत असताना गडचिरोली येथील मोटारवाहन निरीक्षक सचिन जमखंडीकर यांना तो संशयास्पद वाटला. त्यांनी ट्रक थांबवत चालकाला विचारपूस केली असता त्या ट्रकमध्ये गोवंश भरून असल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच कुरखेडा पोलीस स्टेशनला माहिती दिली. ठाणेदार सुधाकर देठे, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे व वाहतूक हवालदार विलास शेडमाके यांनी घटनास्थळ गाठत ट्रकची तपासणी केली. यावेळी ट्रकमध्ये पांढऱ्या रंगाचे ९ गोरे, लाल रंगाचे १८ गोरे तर काळ्या रंगाचे १० गोरे असे एकूण ३७ जीवंत आणि दोन मृत गोरे असे एकूण ३ लाख ९० किमतीचे गोवंश निर्दयीपणे कोंबून वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. आरोपी ट्रक चालक भूषण तरारे (३१, रा.कामठी जि.नागपूर) याला अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात प्राण्यास निर्दयीपणे वागविण्यास प्रतिबंध कायदा १९६० व महाराष्ट्र गोवंश हत्याबंदी सुधारणा अधिनियम २०१५ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व जिवंत गोवंशांची रवानगी गोठणगाव येथील गोशाळेत करण्यात आली.