पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी : रामगड येथील जि.प. समाजकल्याण विभागामार्फत चालविले जाते वसतिगृहलोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : जिल्हा परिषद समाज कल्याण विभागांतर्गत संचालित रामगड येथील वसतिगृहाची जनपदकालीन इमारत मोडकळीस आली आहे. सदर इमारत कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने येथील विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर इमारतीचे तत्काळ निर्लेखन करून नवीन इमारत बांधण्यात यावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. पालक व गावकऱ्यांच्या तक्रारीवरून वसतिगृहाच्या इमारतीला स्थानिक जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी, पंचायत समिती सभापती गिरीधर तितराम, शिक्षण विस्तार अधिकारी यू. एम. राऊत, एस. जी. वाघाडे, गिरीधर आत्राम यांनी भेट दिली. भेटीदरम्यन सदर इमारत जनपदकालीन असून कौलारू इमारतीला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. लाकडी आडे कुजल्या आहेत. कवेलु फुटले असल्याने ठिकठिकाणी पाणी गळते. विद्यार्थ्यांची मुख्य झोपण्याच्या खोलीत पावसाचे पाणी गळत असल्याने एका लहानशा खोलीत विद्यार्थ्यांच्या झोपण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वसतिगृहात ४० विद्यार्थ्यांच्या निवासाची क्षमता आहे. आजमितीला फक्त या ठिकाणी १४ विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेत आहेत. यावेळी मुख्याध्यापक मेहबूब पठाण उपस्थित होते.पाठपुराव्याचे आश्वासनसदर इमारत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागांतर्गत येते. जिल्हा परिषदेकडे दरवर्षी शेकडो कोटी रूपयांचा निधी उपलब्ध होते. या इमारतीच्या दुरूस्तीसाठी जिल्हा परिषदेकडे आपण पाठपुरावा करू, असे आश्वासन जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी, पंचायत समिती सभापती गिरीधर तितराम यांनी दिले. वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे विद्यार्थी वसतिगृहाकडे पाठ फिरवित असून विद्यार्थी संख्या घटली असल्याचे दिसून येत आहे.
जीर्ण वसतिगृहाच्या इमारतीने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका
By admin | Published: July 14, 2017 2:15 AM