जिल्ह्यातील स्तुत्य उपक्रम : सोनापूर ग्रामपंचायतीने केली मदतचामोर्शी : तालुक्यातील सोनापूर ग्रामपंचायतीने क्षेत्र विस्तार कायद्यांतर्गत पाच टक्के अबंध निधीतून अंगणवाडी केंद्राला सौरऊर्जेवर वीज निर्मिती करणारी यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या अंगणवाडीत वीज बिल भरण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांच्या कालावधीत मागास क्षेत्र विकास अनुदान निधीतून जिल्ह्यातील बहुतांश अंगणवाड्यांचे विद्युतीकरण करून दिले. परंतु अंगणवाड्यांचा वीज बिल भरणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला होता. अनेक अंगणवाड्यांचा विद्युत पुरवठाही वीज बिल न भरल्याने खंडित करण्यात आला होता. यावर तोडगा म्हणून सोनापूर ग्रामपंचायतीचे सचिव मधुकर एकनाथ कुकडे व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पाच टक्के अबंध निधीतून सौर यंत्रणा अंगणवाडीला खरेदी करून दिली. त्यामुळे अंगणवाडीची वीज बिल भरण्याचे समस्या कायमची मिटली आहे. या सौरयंत्रणेवर अंगणवाडीतील दोन ट्युबलाईट व दोन सिलिंग पंखे सुरू आहेत. ग्रामपंचायतीला एकूण प्राप्त निधीपैकी काही निधी महिला व बालकल्याण विभागासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. अनावश्यक बाबींवर खर्च करण्याऐवजी सोनापूर ग्रामपंचायतीच्या प्रमाणे सौरयंत्रणा लावल्यास वीज बिलाचा प्रश्न मिटू शकतो. (शहर प्रतिनिधी)
सौरऊर्जेच्या प्रकाशाने अंगणवाडी उजळली
By admin | Published: May 29, 2016 1:31 AM