लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दोन हजार रूपयांपेक्षा अधिकची थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांची वीज जोडणी कापण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली असून ३० व ३१ आॅक्टोबर या दोन दिवसांच्या कालावधीत जवळपास ११०० ग्राहकांची वीज कापण्यात आली आहे. त्यामुळे थकबाकीदार वीज ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत आहे. त्यामुळे महावितरण थकीत वसुलीवर अधिक भर देत आहे. वीज बिलाची रक्कम तत्काळ वसूल व्हावी, यासाठीच महावितरणने मागील पाच वर्षांपासून मासिक बिल पाठविणे सुरूवात केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात दर महिन्याला जवळपास १८ ते १९ कोटी रूपयांची वीज खर्च होते. मात्र तेवढी मासिक वसुली येत नाही. विशेष करून शासकीय कार्यालयांची वसुली दोन ते तीन महिने येत नाही. परिणामी १०० टक्के वसुली होत नाही. कर्मचाºयांअभावी वीज जोडणी तोडण्यास विलंब होतो. परिणामी थकबाकी दोन ते तीन महिन्यांपर्यंत पोहोचते. आॅक्टोबर महिन्यापर्यंत गडचिरोली वीज विभागातील ३ हजार ४२७ ग्राहकांकडे २ कोटी १८ लाख ३३ हजार ६११ रूपयांची थकबाकी आहे. तर गडचिरोली विभागातील २ हजार ८६७ ग्राहकांकडे १ कोटी ५६ लाख ४६ हजार ९९६ रूपयांची थकबाकी आहे.थकीत वसुली व्हावी, त्याचबरोबर थकबाकीदार ग्राहकांना झटका देण्याच्या उद्देशाने गडचिरोली सर्कलचे अधीक्षक अभियंता अशोक म्हस्के यांनी दोन हजार रूपयांपेक्षा अधिकची थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांची वीज जोडणी तोडण्याचे निर्देश ३० आॅक्टोबर रोजी दिले. अधीक्षक अभियंत्यांचे आदेश धडकताच महावितरणच्या जिल्हाभरातील अधिकारी, अभियंता व कर्मचाºयांनी धडक मोहीम सुरू केली असून दोन दिवसांच्या कालावधीत जवळपास १ हजार १०० ग्राहकांचा वीज जोडणी तोडली आहे. सदर मोहीम नियिमित सुरू राहणार असल्याने थकबाकीदार ग्राहकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. अनेकांनी वीज बिल भरण्यास सुरूवात केली आहे.
बिलावरची तारीख हीच अंतिम मुदतमहावितरणच्यावतीने विजेचे मासिक बिल पाठविले जाते. सदर बिल कोणत्याही परिस्थितीत बिलावर दिलेल्या तारखेच्यापूर्वी किंवा तारखेला भरणे आवश्यक आहे. अन्यथा सदर ग्राहकास वीज वितरण कंपनी थकबाकीदार माणून संबंधित ग्राहकाला १५ दिवसांच्या आत वीज बिल भरण्याबाबतचे नोटीस देते. त्यानंतरही संबंधित ग्राहकाने वीज बिल भरले नाही तर त्याचा वीज पुरवठा खंडीत केला जातो. मात्र ग्राहकांच्या तुलनेत वीज कर्मचाºयांची संख्या कमी असल्याने निश्चित कालावधीत वीज जोडणी कापणे शक्य होत नाही. परिणामी काही ग्राहकांकडे दोन ते तीन महिन्यांची थकबाकी राहूनही त्यांचा वीज पुरवठा सुरूच राहतो. त्यामुळे वीज बिल भरण्यासाठी वीज कंपनी एक ते दोन महिने मुदत देते. असा चुकीचा समज वीज ग्राहकांमध्ये निर्माण झाला आहे. १५ दिवस वीज बिल थकीत राहिल्यास संबंधित ग्राहकाची वीज जोडणी कोणत्याही परिस्थिती तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.दोन हजार रूपयांपेक्षा अधिकची थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांविरोधात वीज जोडणी खंडीत करण्याची धडक मोहीम ३० आॅक्टोबरपासून सुरू केली आहे. ही मोहीम थकबाकीदार ग्राहकांची वीज जोडणी खंडीत होईपर्यंत कायम राहणार आहे. थकलेले वीज बिल कधीही भरावेच लागते. मात्र वीज जोडणी कापल्यास संबंधित ग्राहकाची समाजात बदनामी होते. त्याचबरोबर वीज बिल भरेपर्यंत अंधारात राहावे लागते. ही कटू कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी नियमित वीज बिलाचा भरणा करावा.- अशोक म्हस्के, अधीक्षक अभियंता, महावितरण गडचिरोली