सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून, तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अकरा वाजेनंतर लोकांना घराच्या बाहेर निघणे कठीण झाले आहे. तापमानात वाढ झाल्याने चटके बसायला सुरुवात झाल्याने दिवस - रात्र सतत पंखे सुरू आहेत. शहरातील बऱ्याचशा लोकांनी आपले कूलरही सुरू केले आहेत. अशा स्थितीत गेल्या काही दिवसांपासून आरमोरी शहरात विजेचा लपंडाव वाढल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
ग्रामीण भागातील परिस्थिती तर याहून अतिशय गंभीर आहे. एकदा वीज खंडित झाली तर दोन दोन तीन तीन तास विजेचा पत्ता नसतो. कधी कधी दिवसभर तर कधी रात्रभर गायब असते. अशा कठीण परिस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे. वारंवार विजेच्या सततच्या ये-जा यामुळे लहान मुलांना मोठा फटका बसत आहे.
उन्हाळा सुरू झाल्याने वीज वितरण कंपनीने आरमोरी शहर व ग्रामीण भागात सतत खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली जात आहे.