गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उन्हाळी धान पीक घेतले जाते. आता उन्हाळी धान पिकाचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी धान पिकाला मोटार पंपद्वारे पाणी भरण्याच्या कामात आहेत. मात्र वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने धान पिकाला पाणी देणे कठीण झाले आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने उकाडा व तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. सकाळी ११ वाजल्यानंतर सर्वसामान्य लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. त्यामुळे कोरोना काळात उकाड्यापासून बचाव करण्यासाठी लोक कुलर व पंखे सुरू करून घरात राहत असताना दिवसातून अनेक वेळा विजेचा लपंडाव व वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने उकाड्याने नागरिकांचे व लहान मुलांचे हाल होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता व शेतकरी त्रस्त असून वीज वितरण कंपनीच्या कारभार विराेधात रोष व्यक्त होत आहे. त्यामुळे खंडित वीजपुरवठा सुरळीत करून सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीने सुविधा पुरवावी, अशी मागणी प्रहारचे निखिल धार्मिक यांनी केली आहे.
बाॅक्स
पाणी देण्यासाठी शेतकरी करतात जागल
आरमोरी तालुक्यात पाण्याच्या सुविधेचा अभाव असल्याने डोंगरगाव (भु.) व अन्य गावातील शेतकरी बांधवांनी स्वतःच्या शेतात विहिरी खोदून विहिरीवर धान पिकाला पाणी देण्यासाठी वीजपंप लावून पाण्याची सोय केलेली आहे. परंतु डोंगरगाव व तालुक्यातील इतर गावातील वीजपुरवठा दिवसा तर कधी रात्री केव्हाही खंडित होऊन ३-४ तास वीजपुरवठा बंद राहताे. विहिरीवर वीजपंप बसवून सुद्धा धान पिकाला पाणीपुरवठा बरोबर होत नाही. त्यामुळे धान पीक धोक्यात आले आहे. पाण्याअभावी धान पीक करपण्याच्या मार्गावर आहे. विजेच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री केव्हाही जाऊन धान पिकाला पाणी देण्यासाठी कसरत करावी लागते.