काॅम्प्लेक्समधील पाेलीस रुग्णालयात झालेल्या या शिबिराच्या उद्घाटनपर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल, तर प्रमुख अतिथी म्हणून अपर पाेलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अ. पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अनिल रुडे, सीआरपीएफच्या १९२ बटालियनचे कमाडिंग ऑफिसर जियाऊ सिंह, द्वितीय कमांडिंग ऑफिसर प्रभात गौतम व दीपक शाहू आणि उपकमाडंट सपन सुमन व संध्या राणी, आदी अधिकारी गण प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी बाबूजींच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
यावेळी ५५ पेक्षा अधिक नागरिकांनी रक्तदान केले. काही रक्तदात्यांना येण्यास उशीर झाल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदानासाठी पाठविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘लाेकमत’चे कार्यालय प्रमुख डाॅ. गणेश जैन यांनी, तर जिल्हा प्रतिनिधी मनाेज ताजने यांनी सूत्रसंचालन केले. मार्गदर्शन कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष रक्तदानाला सुरुवात झाली.
या कार्यक्रमासाठी लोकमत इव्हेंट संयोजिका रश्मी आखाडे, हरीश सिडाम, दिगांबर जवादे, दिलीप दहेलकर, गोपाल लाजूरकर, विकास चौधरी, विवेक कारेमोरे, श्रीरंग कस्तुरे, निखिल जरूरकर, प्रज्वल दुर्गे, तसेच लोकमत सखी मंचच्या सोनिया बैस, नलिनी बोरकर, विभा उमरे, अंजली वैरागडवार, रोहिनी मेश्राम, मृणाल उरकुडे, वंदना दरेकर आणि पोलीस विभागाच्या चमूने सहकार्य केले.
(बॉक्स)
रक्तदानाचा उपक्रम प्रशंसनीय
याप्रसंगी जिल्हा पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल म्हणाले, लाेकमत वृत्तपत्र समूहाने सुरू केलेला महारक्तदानाचा उपक्रम प्रशंसनीय आहे. या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना रक्त मिळण्यास मदत हाेईल. अशा सामाजिक उपक्रमांना जिल्हा पाेलिसांचे नेहमीच सहकार्य राहील. ‘लाेकमत’ने अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम नेहमी राबवावे, अशी अपेक्षाही पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केली.
(बॉक्स)
‘लोकमत’च्या उपक्रमामुळे गरजूंना मिळेल रक्त
जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. अनिल रुडे म्हणाले, रक्तदान हे महादान आहे. गर्भवती महिलांना प्रसूतीच्या वेळी, तसेच गंभीर आजार व अपघातग्रस्त रुग्णांना रक्ताची अत्यंत आवश्यकता असते. गडचिराेली व अहेरी येथील रक्तपेढीच्या माध्यमातून रक्तसंकलन केले जाते. काेराेना संकटामुळे जिल्ह्यात सध्या रक्ताचा तुटवडा आहे. रक्ताच्या तुटवड्याची उणीव लाेकमत समूहाच्या माध्यमातून काही प्रमाणात का असेना, भरून काढली जात आहे. ‘लाेकमत’च्या या स्तुत्य उपक्रमामुळे गरजू रुग्णांची रक्ताची गरज पूर्ण हाेईल. जिल्ह्यात संकलन हाेणाऱ्या रक्ताचा उपयाेग जिल्ह्यातीलच रुग्णांसाठी केला जाईल, असे डॉ. रूडे म्हणाले.
अनेक महिला रक्तदानापासून वंचित
रक्तदान करण्यापूर्वी प्रत्येक दात्याची रक्तातील हिमोग्लोबीन, रक्तगट व इतर आवश्यक तपासणी केली जात होती. यात अनेक जणांचे हिमोग्लोबीन आवश्यकतेपेक्षा कमी आले. विशेषत: रक्तदानासाठी इच्छुक असलेल्या महिलांचा यामुळे चांगलाच हिरमोड झाला. पुढल्या वेळी हिमोग्लोबीन वाढवून येणार आणि रक्तदान करूनच परत जाणार, असा निश्चय अनेक महिलांनी बोलून दाखविला.
शिस्तबद्धता आणि स्वच्छतेमुळे रक्तदाते प्रभावित
कोरोनाचा काळ अजून संपलेला नाही. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन करीत पोलीस रुग्णालयातील स्वच्छता आणि कार्यक्रमातील शिस्तबद्धता यामुळे कार्यक्रमासाठी आलेले रक्तदातेही प्रभावित झाले होते.