(तळोधी मो,हिवरगाव,कुनघाडा जोगणा येडानूर येथे दारूचा महापूर)
तळोधी (मो) : चामोर्शी पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या तळोधी, कुनघाडा, जोगणा, हिवरगाव येथे मोहफूल व गुळाची दारू गाळली जाते; परंतु तक्रारी करूनही या अवैध प्रकाराकडे चामाेर्शी पाेलिसांचे दुर्लक्ष हाेत असल्याने अवैध विक्रेत्यांचे फावले आहे. कारवाई हाेत नसल्याने तळाेधीसह चारही गावांत दारूचे पाट वाहत आहेत. येथे उपलब्ध हाेणारी दारू परिसराच्या गावातील व्यसनी लाेक पित असल्याने गावातील शांतता व सुव्यवस्था धाेक्यात आली आहे.
चामोर्शी तालुक्यातील तळाेधी माेकासा हे राष्ट्रीय महामार्गावरील गाव आहे. त्यामुळे येथे बाहेरगावच्या लाेकांची नेहमीच वर्दळ असते. याचाच फायदा घेत काही लाेकांनी अवैध दारूविक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. येथील अवैध व्यवसायाविषयी पोलिसांना माहिती आहे; परंतु दारूविक्रेत्यांवर कारवाई होत नाही. पाेलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांशी अवैध दारू विक्रेत्यांची जवळीक असल्याने दारू विक्रेत्यांची हिंमत वाढली आहे. दारू विक्रेत्यांना पकडून पाेलीस स्टेशनमध्येच घेऊन जाणार, एक केस हाेईल, त्यावर काय हाेणार? केस हाेणे ही नित्याचीच बाब आहे. पाेलिसांना आम्ही पैसे देताे. त्यामुळे गाववाले काय करतील, ठाण्यातील साहेब लोकच आमचे आहेत, असे अनेक दारू विक्रेते अहंभावाने भर चाैकात बाेलतात. त्यांची हिंमत एवढी वाढली आहे की दारू पुरवठादारास भर चाैकातून दारू कधी येईल, याबाबत विचारतात. तळाेधी येथील अवैध दारू विक्रीबाबत यापूर्वीही अनेकदा कमिटीमार्फत पोलीस स्टेशनला तक्रारी नाेंदविल्या; परंतु काही दिवसांसाठी विक्री कमी करून पुन्हा ‘जैसे थे’ दारूविक्री सुरू झाली. आठवड्यातून किंवा महिन्यातून दोनदा काही पोलीस कर्मचारी दारू विक्रेत्यांकडून आर्थिक लाभ करून घेण्यासाठी फेऱ्या मारत असल्याचीही चर्चा गावात आहे. अवैध दारूविक्रीमुळे विक्रेते मालामाल तर दारूडे कंगाल हाेत आहेत. ‘नवरा तुपाशी, बायकाे-पाेर उपाशी’ अशी स्थिती त्यांच्या कुटुंबाची झाली आहे. त्यामुळे दारू विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.
बाॅक्स
पांढरीभटाळ दारू विक्रीचे केंद्र
तळाेधीसह चारही गावांतील विक्रेत्यांना १० कि.मी. अंतरावरील पांढरीभटाळ येथून ४ पुरवठादार माेहफूल, गुळाची दारू पुरवितात. याव्यतिरिक्त देशी, इंग्लिश दारू उपलब्ध करतात. परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांवर पाेलीस कठाेर कारवाई करीत नसल्याने दारू विक्रीचा अवैध धंदा जाेमात सुरू आहे. दारू विक्रेत्यांना पाेलिसांचा धाक नसल्याने पुन्हा हा अवैध धंदा फाेफावण्याचा धाेका आहे. ‘थोडे दिन तुम, बाकी दिन हम’ असेच सुरू राहणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.