गडचिरोली : जिल्ह्यातील दारूबंदीची प्रशासनाने अंमलबजावणी करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वत: अंमलबजावणी करेल असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष विश्वासराव देशमुख यांनी आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी ही दारूबंदी नावापुरतीच उरली आहे. खेडोपाडी व शहरातील प्रत्येक वार्डात दारूची खुलेआम विक्री केली जात आहे. गडचिरोली शहर पोलीस स्टेशनच्या १०० मीटरच्या आवारातही दारू मिळत आहे. पोलीस प्रशासन व एक्साईज विभाग यावर केवळ बघ्याची भूमिका निभावित आहे. चोरट्या मार्गाने दारूची वाहतूक राजरोसपणे केली जात आहे. नकली दारूचाही पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दारूबंदीची चार दिवसांच्या आत कडक अंमलबजावणी करावी अन्यथा मनसे स्वत:च्या पद्धतीने दारूबंदीची अंमलबजावणी करेल. मनसे स्वत: प्रत्येक गावात १० कार्यकर्त्यांची दारूबंदी समिती स्थापन करेल. त्याचबरोबर ज्या मार्गाने चंद्रपुर जिल्ह्यातून दारूची वाहतूक केली जाते. त्या मार्गांवर मनसेचे कार्यकर्ते स्वत: पाळत ठेवतील. ज्या वाहनातून दारूची वाहतूक केली जाते, सदर वाहन अडवून त्याची तपासणी केली जाईल. तपासणीमध्ये दारू आढळून आल्यास पोलीस विभागाला बोलावून संबंधित वाहन चालक, दारूचा मालक यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडल्या जाईल, असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष विश्वास देशमुख यांनी दिला आहे. यावेळी एजाज शेख, समीर बैस यांच्यासह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
दारूबंदीची मनसे स्वत: अंमलबजावणी करणार
By admin | Published: August 06, 2014 11:51 PM