येरंडी येथील घटना : तपासणीनंतर जंगलात सोडलेकुरखेडा : विहिरीत पडलेल्या मादी जातीच्या अस्वलाला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी सकाळी ११ वाजता बाहेर काढून जीवदान दिले. सदर घटना येरंडी येथे घडली. कुरखेडा तालुक्यातील येरंडी येथील जंगलाशेजारी असलेल्या शेतशिवारातील तोंडी नसलेल्या विहिरीत अस्वल पडले असल्याचे गावातील महिलांना दिसून आले. येरंडी वन व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब कुरखेडा येथील वन परिक्षेत्राधिकारी यांना कळविली. घटनेची माहिती मिळताच वडसा येथील उपवनसंरक्षक कोडाप, वन परिक्षेत्राधिकारी कोरेवार, क्षेत्र सहायक मनेवार, ठाकरे, मेटे, वनरक्षक राऊत साहित्यासह घटनास्थळी दाखल झाले. पुराडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पाल सुध्दा घटनास्थळी आले. विहिरीत मोठी जाळी टाकून अस्वलाला विहिरीच्या बाहेर काढण्यात यश मिळाले. अस्वलाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता, अस्वलाची प्रकृती सुस्थितीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांनी सदर अस्वलाला जंगलात सोडून दिले. बचाव मोहिमेत पोलीस, वन व्यवस्थापन समितीचे सदस्य, भाजपाचे तालुकाध्यक्ष राम लांजेवार, पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांच्यासह गावकऱ्यांनी सहकार्य केले. तोंडी नसलेल्या विहिरी पाळी प्राणी व वन्य पशुसाठी धोकादायक आहेत. त्यामुळे प्रत्येक विहिरीला तोंडी बांधण्याची मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
विहिरीत पडलेल्या अस्वलाला जीवदान
By admin | Published: July 11, 2016 1:18 AM