गडचिरोली : चामाेर्शी तालुक्याच्या कोनसरी येथील लाॅयड्स मेटल ॲण्ड एनर्जी लिमिटेड कंपनीने विना परवानगी १९५ ब्रास मुरूम उत्खनन करून वाहतूक केल्याप्रकरणी १६ लाख ७७ हजार रुपयांचा दंड १४ जून राेजी ठाेठावण्यात आला. ही कारवाई चार्मोशीचे तहसीलदार प्रशांत मोकडे यांनी केली.
दिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या एकलव्य निवासी शाळेच्या बांधकामाकरिता लाॅयड मेटल ॲण्ड एनर्जी लिमिटेड कंपनीला मुरूम उत्खननासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, परवानगीपेक्षा अधिक ब्रास मुरुमाचे उत्खनन झाल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली हाेती. या तक्रारीवरून महसूल अधिकारी व भूकरमापकांनी माेका चाैकशी केली.
यात कंपनीतर्फे १९५ ब्रास मुरूम अवैधरीत्या उत्खनन करून विनापरवाना वाहतूक केली असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे गौण खनिजाच्या प्रचलित बाजार मूल्याच्या पाचपट रक्कम दंडाची कारवाई करण्यात आली. यानुसार १५ लाख ६० हजार रुपये व एक लाख १७ हजार रुपये राॅयल्टीची रक्कम असा एकूण १६ लाख ७७ हजार रुपये दंडाचा आदेश तहसीलदार प्रशांत भोकरे यांनी १४ जून रोजी निर्गमित केला.