आधुनिक पद्धतीने शेती करताना पीक लागवडीचा खर्च माेठ्या प्रमाणात वाढला आहे. एवढा पैसा शेतकऱ्याजवळ राहत नसल्याने सावकाराकडून कर्ज घेतल्याशिवाय पर्याय राहत नव्हता. अनेक शेतकरी सावकाराकडून लुबाडले जात हाेते. शेतीत पिकलेले उत्पन्न सावकारालाच द्यावे लागत हाेते. ही बाब ओळखून शासनाने शेतकऱ्यांना बँकांनी पीककर्ज उपलब्ध करून द्यावे असे निर्देश दिले आहेत. प्रत्येक बँकेला पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्टही देण्यात आले आहे; मात्र बँका शेतकऱ्यांना कर्ज देताना हात आखडता घेत असल्याचे दिसून येते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बँकांनी केवळ उद्दिष्टाच्या ४५.७५ टक्केच कर्ज वितरण केले आहे.
बहुतांश शेतकरी खरीप हंगामाला सुरुवात हाेण्यापूर्वीचे कर्ज घेतात. आता राेवणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कर्जाची आकडेवारी वाढण्याची फारच कमी शक्यता आहे.
बाॅक्स
सहकारी बँकेचा वाटा ६१ टक्के
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हाभरात एकूण ५१ शाखा आहेत. यातील बहुतांश शाखा ग्रामीण भागात कार्यरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची नाळ या बँकेसाेबत जाेडली आहे. परिणामी बहुतांश शेतकरी याचा बँकेमधून कर्ज घेण्यासाठी प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यावर्षीच्या खरीप हंगामात १३ हजार ५६४ शेतकऱ्यांना सुमारे ५० काेटी २६ लाख रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. जिल्ह्यातील एकूण बँकांच्या कर्ज वितरणाच्या हे प्रमाण ६१ टक्के एवढे आहे. विशेष म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज वितरणात नेहमीच आघाडीवर राहते.
बाॅक्स
दुर्गम भागातील शेतकरी कर्जाच्या याेजनेपासून अनभिज्ञ
-पीक कर्जाचा भरणा ३१ मार्चपूर्वी केल्यास कर्जावरील व्याज माफ केले जाते. म्हणजेच शेतकऱ्याला केवळ कर्जाची मुद्दल भरावी लागते;मात्र दुर्गम भागातील अनेक शेतकऱ्यांना या याेजनेची माहिती नाही. त्यामुळे शेतकरी बचत गटाकडूनच कर्ज घेत असल्याचे दिसून येते. बचत गटाचेही व्याज अधिक राहते.
- जिल्ह्याच्या विस्ताराच्या तुलनेत बँकांची संख्या अतिशय कमी आहे. त्यातही एटापल्ली, भामरागड, सिराेंचा, काेरची या तालुक्यांमध्ये तर बँकांची संख्या केवळ दाेन ते तीन आहे. ५० किमी अंतरावर असलेल्या शेतकऱ्याला कर्जासाठी बँकेत जाणे परवडत नाही. अनेकांना बँकांचे व्यवहारही माहीत नाही.त्यामुळे ते पीककर्ज घेण्यास तयार हाेत नसल्याचे दिसून येते.