लोकमत न्यूज नेटवर्क कुरखेडा : कंत्राटी शिक्षक भरतीत जिल्ह्यातीलच उमेदवारांना प्राधान्यक्रमाने समावून घेण्याचे आदेश दिले असतानाही जिल्ह्याबाहेरील उमेदवारांच्या नियुक्त्या करण्यात आल्याने जिल्ह्यातील उमेदवारावर अन्याय झाला आहे. या नियुक्त्त्या तत्काळ रद्द करीत जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्यक्रमाने समावून घेण्यात यावे या मागणीचे निवेदन बेरोजगार संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी कुरखेडामार्फत शिक्षणाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.
जिल्ह्यात नुकतीच कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या भरतीत जिल्ह्यातील स्थानिक उमेदवार असतानाही जिल्ह्याबाहेरील १८९ उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांत मोठा असंतोष निर्माण झाला आहे. जिल्ह्यात डीएड, बीएड, उत्तीर्ण अनेक युवक-युवती बेरोजगार आहेत. मात्र, आयुक्तांचा आदेश डावलत शिक्षण विभागाने जिल्ह्याबाहेरील उमेदवारांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या नियुक्त्या रद्द करीत स्थानिक डीएड, बीएड उत्तीर्ण उमेदवारांना टीईटीची अट रद्द करीत नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना अंकुश कोकोडे, भास्कर ठलाल, चरण बंसोड, वंदना कवरके, पौर्णिमा सहारे, धनंजय पालीवाल, रमेश कवरके, प्रियंका कोरेटी, सुप्रिया नैताम, मिथुन ठलाल, रूपेश शिवरकर, मोनाली गहाणे, निकिता मोहुर्ले, लंकेश मेश्राम, अल्का बंसोड, कांचन सहारे, नास्तिक पंधरे, रेखा पंधरे, टोकेश लाडे, महेश गहाणे, ललिता मेश्राम, गणेश मेश्राम, हितेश ठलाल उपस्थित होते.
आंदोलनाचा इशारा स्थानिक उमेदवारांना डावलून जर दुसऱ्या जिल्ह्यातील उमेदवारांना नियुक्ती दिली जात असेल तर हा अन्याय आहे. याविरोधात जिल्ह्यातील बेरोजगारांच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. शिक्षण विभागाच्या कार्यप्रणालीवर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांची नियुक्त्ती रद्द करण्याची मागणी केली आहे.