लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी पंचायत समितीअंतर्गत रामपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चवथीमध्ये एकूण ४३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र येथे चार वर्गासाठी एकच शिक्षक कार्यरत आहे. येथे शिक्षकांची कमतरता असल्याने शैक्षणिक नुकसानीच्या मुद्यावर शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ आक्रमक होत मंगळवारी या शाळेला कुलूप ठोकले.रामपूर जि. प. शाळेत शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी प्रशासनाकडे ग्रामस्थांनी केली होती. मात्र प्रशासनाने याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. जोपर्यंत या शाळेला शिक्षक मिळणार नाही, तोपर्यंत सदर शाळेच कुलूप उघडणार नाही, असा पवित्रा रामपूर येथील शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी घेतला आहे.सदर प्राथमिक शाळेत दोन शिक्षिका होत्या. मात्र या दोन शिक्षिकांमध्ये मतभेद असल्याची तक्रार प्रशासनाकडे पोहोचली. त्यानंतर एका शिक्षिकेची डोंगरसावंगी येथील शाळेत बदली करण्यात आली. त्यानंतर दुसºया शिक्षिकेचीही बदली झाली. तेव्हापासून या शाळेत वसाडे हे एकमेव शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षकांची मागणी करूनही शाळेत शिक्षकांची नियुक्ती करण्यात न आल्याने संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता रामपूर शाळेला कुलूप ठोकले. त्यानंतर पदाधिकारी व अधिकाºयांनी रामपूर शाळेला भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. शिक्षिका देण्याचे आश्वासनही दिले. मात्र आम्हाला या शाळेत महिला शिक्षिका नको, पुरूष शिक्षकच पाहिजे, असा आग्रह धरला. त्यामुळे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकाºयांना आल्यापावली परत जावे लागले. शिक्षकांच्या प्रश्नावर यावर कोणताही तोडगा निघाला नाही.याप्रसंगी मनोहर ठाकरे, वंदना सरपे, प्रेमदास ढोगे, होमराज ठाकरे, रूमदेव सहारे, श्यामराव सरपे, शरद लेनगुरे, अशोक मोहुर्ले, चंद्रशेखर रणदिवे, मंगेश मोहुर्ले, नकूल कलसार, धनपाल महामंडरे, कुश वाटगुरे, नाजूक कलसार, धनंजय नाडे, उमाजी प्रधान, देविदास प्रधान आदींसह शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. पुरूष शिक्षक शाळेला मिळाल्याशिवाय कुलूप उघडणार नाही, असा निर्धार ग्रामस्थांचा आहे.पुरूष शिक्षकाची नियुक्ती करा, पालकांचा आग्रहरामपूर जि. प. शाळेला कुलूप ठोकल्याबाबतची माहिती जिल्हा परिषद सदस्य मनीषा दोनाडकर यांना मिळाली. त्यांनी रामपूर शाळेत शिक्षक देण्याबाबतची सूचना गटशिक्षणाधिकारी परसा यांना केली. यावर सदर शाळेत एक महिला शिक्षिका देण्याचे त्यांनी मान्य केले. त्यानंतर पं. स. सभापती बबीता उसेंडी, उपसभापती यशवंत सुरपाम, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. राठोड यांनी सदर शाळेला भेट दिली. दरम्यान शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला असता, सदर शाळेत आम्हाला महिला शिक्षिका नको, पुरूष शिक्षक द्या, अशी मागणी करून ते या मागणीवर ठाम होते.
ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 12:30 AM
आरमोरी पंचायत समितीअंतर्गत रामपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चवथीमध्ये एकूण ४३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
ठळक मुद्देरामपूर जि. प. शाळेत एकच शिक्षक : शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आक्रमक