लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशासह राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातल्यामुळे संचारबंदी जाहीर करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून किराणा व भाजीपाला वगळता इतर सर्वच दुकाने बंद आहेत. किरकोळ विक्रेते, दुकानदार व ठोक व्यापारी यांच्याकडून दैनंदिन ठेवी गोळा करणाऱ्या जिल्ह्यातील पतसंस्थांच्या १०० वर अभिकर्त्यांची पिग्मी आरडी वसुली थांबली आहे. परिणामी त्यांना एप्रिल महिन्यात कमिशनपोटी मानधन मिळणार नसल्याने त्यांच्यापुढे आर्थिक संकट कोसळले आहे.जिल्हा व तालुका उपनिबंधक सहकारी संस्था गडचिरोली अंतर्गत शेकडो नागरी सहकारी व पगारदार तसेच कर्मचारी पतसंस्था आहेत. या पतसंस्थांनी पिग्मी ठेवी स्वीकारण्यासाठी आपल्यास्तरावर अभिकर्ते (एजन्ट) नेमले आहेत. सदर एजन्ट गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, देसाईगंज, धानोरा शहरासह मोठ्या गावांमध्ये फिरून दुकानदारांकडून पिग्मी आरडी वसुली करतात. दुसऱ्या दिवशी ही रक्कम संबंधित दुकानदारांच्या सहकारी संस्थांच्या खात्यामध्ये भरली जाते. कोरोनाच्या संचारबंदीमुळे २० मार्चपासून गडचिरोली जिल्ह्यातील दुकाने बंद आहेत. त्यामुळे अभिकर्त्यांची पिग्मी आरडी वसुलीही थांबली आहे.महिन्याला दोन ते तीन लाख तर काही एजन्ट पाच ते सहा लाख रुपये जमा करणारे आहेत. सकाळी व सायंकाळी अशा दोन्ही वेळी हे एजन्ट पिग्मी वसुली करतात. या एजन्टला सहकारी पतसंस्थांकडून ३ टक्के दराने कमिशन मिळत असते. एक लाख रुपयाची वसुली करणाºया एजन्टला महिन्याला तीन हजार रुपये मिळतात. गडचिरोली शहरात व जिल्ह्यात ज्या ठिकाणी सहकारी पतसंस्था आहेत, अशा गावातील अनेक बेरोजगार युवक पिग्मी ठेव वसुलीच्या कामात आहेत. पूर्णवेळ हे काम करणारा पिग्मी एजन्ट महिन्याला १२ ते १५ हजार रुपये कमावतो. मात्र गेल्या महिन्याभरापासून दुकाने बंद असल्याने पिग्मी ठेव वसुली पूर्णत: थांबली आहे. त्यामुळे एजन्टचे कमिशनही बुडले आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या व पिग्मी वसुलीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह असलेल्या शेकडो एजन्टसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.२२ मार्चपासून पिग्मी अभिकर्त्यांच्या कलेक्शनवर परिणाम झाला असून हा परिणाम ३ मे पर्यंत कायम राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या एजन्टांना दोन महिन्याच्या कमिशनवर पाणी फेरावे लागले आहे. आरडी वसुलीशिवाय दुसरा कोणताही व्यवसाय नसल्याने संकट ओढवले आहे.पतसंस्थांच्या उलाढालीवर परिणामजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह गडचिरोली शहर तसेच जिल्हास्तरावरील महिला नागरी सहकारी, कर्मचारी व पगारदार सहकारी पतसंस्थांमध्ये अनेक दुकानदारांचे पिग्मी ठेव खाते आहे. सायंकाळी अभिकर्ते पिग्मी ठेव वसुली करून जिल्हा बँक व पतसंस्थांमध्ये जाऊन संबंधितांच्या खात्यामध्ये पैसे भरतात. कोरोनामुळे दुकाने बंद असल्याने जिल्हा बँक व पतसंस्थांच्या आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला आहे.२२ मार्चपासून दैनंदिन कलेक्शन रोडावले आहे. दरमहा १५ ते २० हजार रुपये मिळणारे कमिशन दोन ते तीन हजार रुपयांवर आले आहे. या तुटपुंज्या कमिशनवर संसाराचा गाळा ओढणे कठीण झाले आहे. आम्हाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी शासनाने मदत करावी.- संदीप आकरे,अभिकर्ता, गडचिरोली
पिग्मी अभिकर्त्यांना लॉकडाऊनचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 5:00 AM
किरकोळ विक्रेते, दुकानदार व ठोक व्यापारी यांच्याकडून दैनंदिन ठेवी गोळा करणाऱ्या जिल्ह्यातील पतसंस्थांच्या १०० वर अभिकर्त्यांची पिग्मी आरडी वसुली थांबली आहे. परिणामी त्यांना एप्रिल महिन्यात कमिशनपोटी मानधन मिळणार नसल्याने त्यांच्यापुढे आर्थिक संकट कोसळले आहे.
ठळक मुद्देआर्थिक तंगीचा सामना : महिनाभरापासून दुकाने बंद असल्याने दैनिक वसुली थांबली