लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे असलेल्या विश्वशांती विद्यालयातल्या प्रवासी निवारा केंद्रात एका महिलेची प्रसूती बुधवारी झाली. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. कामिना मेपाल नन्नावरे असे या महिलेचे नाव आहे.बुधवारी संध्याकाळी येथे जोराचे वादळ आल्याने वीज पुरवठा खंडित झालेला होता. अशातच या महिलेला प्रसुती कळा यायला सुरुवात झाली. एवढ्या रात्री व पावसाच्या वातावरणात तिला दवाखान्यात नेणे शक्य नव्हते. तिला दवाखान्यात न नेता पाड्यावरच तिचे बाळंतपण करण्याचा निर्धार तेथील महिलांनी घेतला व तसे प्राथमिक रुग्णालयाला कळवले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुपकुमार कमल व परिचारिका यांनी पाड्यावर जाऊन या महिलेची प्रसूती केली. तिला नंतर प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. नवजात बाळाची व महिलेची प्रकृती उत्तम आहे.
लॉकडाऊनमुळे प्रवासी निवारा केंद्रातच झाली गर्भवती महिलेची प्रसूती; गडचिरोली जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 11:22 AM