लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : धानोरा तालुक्याच्या मुरूमगाव येथील बीएसएनएलचे कार्यालय भाड्याच्या इमारतीत गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. बीएसएनएल कार्यालयाने इमारतीच्या भाड्याची रक्कम प्रलंबित ठेवल्याने संतप्त झालेल्या घरमालकाने चक्क बीएसएनएलच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. परिणामी ३० जानेवारीपासून मुरूमगाव परिसरातील बीएसएनएलची सेवा पूर्णत: ठप्प झाली आहे.मुरूमगाव येथे बीएसएनएलची दूरसंचाराची एकमेव सेवा आहे. इतर कोणत्याही खासगी कंपन्यांचे या भागात नेटवर्क नाही. त्यामुळे मुरूमगाव भागातील भ्रमणध्वनीधारक याच सेवेवर अवलंबून असतात. मुरूमगाव येथे बँक, डाक कार्यालय, दवाखाना, शाळा महाविद्यालय तसेच वन विभाग, महाविरण, महसूल आदी विभागाचे कार्यालय आहे. त्यामुळे विविध योजना तसेच दैनंदिन आर्थिक व्यवहार करण्यासाठी मुरूमगाव परिसराच्या अनेक गावातील लोक मुरूमगाव येथेही दररोज येतात. मात्र बीएसएनएलची भ्रमणध्वनी व इंटरनेट सेवा ठप्प असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथे मध्यवर्ती व मुख्य ठिकाणचे गाव आहे. या भागातील बीएसएनएलची सेवा ठप्प झाल्याने लगतच्या छत्तीसगड राज्यामधील टॉवरच्या आधारे काही लोक दूरसंचार सेवा घेत आहेत.मुरूमगाव येथील प्रदीप यमदास पोटवार यांच्या घरी बीएसएनएलचे कार्यालय भाडेतत्वावर आहे. प्रती महिना ३ हजार ५०० रुपये प्रमाणे इमारत भाडे निश्चित झाले. मात्र २०१४ पासून आतापर्यंत तब्बल चार वर्षाची इमारत भाड्याची रक्कम बीएसएनएल कार्यालयाकडे प्रलंबित आहे. इमारत भाडे थकीत ठेवल्याने घरमालक कोठवार याने ३० जानेवारीला आपल्या घरी असलेल्या बीएसएनएलच्या कार्यालयाला चक्क कुलूप ठोकले. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून मुरूमगाव परिसरातील बीएसएनएलची सेवा ठप्प आहे. शासकीय कामे खोळंबली असून नागरिकांना एकमेकांशी संपर्क करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
इमारत मालकाने बीएसएनएल कार्यालयाला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 1:17 AM
धानोरा तालुक्याच्या मुरूमगाव येथील बीएसएनएलचे कार्यालय भाड्याच्या इमारतीत गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. बीएसएनएल कार्यालयाने इमारतीच्या भाड्याची रक्कम प्रलंबित ठेवल्याने संतप्त झालेल्या घरमालकाने चक्क बीएसएनएलच्या कार्यालयाला कुलूप ठोकले.
ठळक मुद्देभाडे थकल्याचे कारण : मुरूमगाव परिसरात पाच दिवसांपासून सेवा ठप्प