लोकमत न्यूज नेटवर्कघोट : चामोर्शी तालुक्यातील चापलवाडा ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यास होत असलेल्या विलंबामुळे संतापलेल्या नागरिकांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले.शौचालयाचे बांधकाम पूर्ण झालेल्या नागरिकांना १२ हजार रूपयांचा धनादेश देण्याकरिता ग्रामपंचायतीचा शिपाई पुरूषोत्तम गांधरवार याने प्रत्येकी २०० रूपये तर घरकूल बांधकामाचा धनादेश देण्याकरिता एक हजार रूपये घेतले. याबाबतची कबुली शिपायाने ग्रामसभेसमोर दिली आहे. ग्रामसभेने ठराव घेऊन त्याला कामावरून कमी केले. तरीही तो अजूनही पदावर कार्यरत आहे. संगणक चालक नसतानाही त्याच्यावर १ लाख ४७ हजार ८७२ रूपये खर्च दाखविला आहे. ९ आॅक्टोबरला संगणक चालकाची जागा भरण्याकरिता नोटीस लावली. इतर कामकाजातही गैरव्यवहार ग्रामसभेसमोर आला आहे. याबाबत ३० आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली. ४५ दिवसांचा कालावधी उलटूनही प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. परिणामी संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी सामूहिकरित्या ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले. २४ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहाराची चौकशी चामोर्शी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांचेमार्फत न करता जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून करावी, दोषी सरपंच व सचिवावर कारवाई करावी, अशी मागणी चापलवाडा येथील ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामपंचायतीला कुलूप ठोकतेवेळी नितेश कोहपरे, अमर पितनिया, गणेश वाकुडकर, परशुराम वाकुडकर, गजानन धानफोले, अमित पातरे, मुकेश कुसराम, प्रफुल्ल धानफोले, विलास धानफोले, मोरेश्वर देशमुख, अतुल झगडकर, मधुकर धुर्वे, मीनल बिश्वास आदी उपस्थित होते.
ग्रा.पं.ला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:18 PM
चामोर्शी तालुक्यातील चापलवाडा ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यास होत असलेल्या विलंबामुळे संतापलेल्या नागरिकांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले.
ठळक मुद्देगैरव्यवहाराची चौकशी करा : दोन लाखांचा अतिरिक्त खर्च