बीडीओंची भेट : दारूड्या मुख्याध्यापक व शिक्षकांमुळे विद्यार्थी त्रस्त भामरागड : भामरागड पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोडराज येथील मुख्याध्यापकासह इतर दोन शिक्षकही दारू पिऊन येत असल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी शाळेला कुलूप ठोकून सदर शिक्षक व मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणी केली आहे. धोडराज येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. येथील मुख्याध्यापक हेमके, सहायक शिक्षक रत्नम व कुळमेथे हे दारू पिऊन शाळेमध्ये येत होते. याचा विपरित परिणाम विद्यार्थ्यांच्या बाल मनावर होत होता. गावकऱ्यांनी त्यांना दारू पिऊन शाळेत न येण्याचा इशारा दिला होता. त्याचबरोबर याबाबतची तक्रार यापूर्वीही पंचायत समितीकडे केली होती. मात्र पंचायत समिती प्रशासनानेही त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी मंगळवारी शाळेलाच कुलूप ठोकले व याबाबतची माहिती संवर्ग विकास अधिकारी यांना दिली. जोपर्यंत संवर्ग विकास अधिकारी येत नाही, तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नाही, असा इशारा दिला. त्यामुळे संवर्ग विकास अधिकारी गावात दाखल झाले. चार महिन्यांपूर्वी रत्नम या शिक्षकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्याचबरोबर या तिन्ही शिक्षकांचे इंक्रिमेंट बंद करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यांच्यामध्ये कोणताही बदल झाला नसल्याने नागरिकांनी शाळेला कुलूप ठोकले. बीडीओंनी कारवाई करीत मुख्याध्यापक हेमके यांना पदावरून हटवून संतोष टेंभूर्णे यांच्याकडे पदभार सोपविला. त्याचबरोबर इतर शिक्षकांवरही कारवाई करण्याचे आश्वासन दिले. संवर्ग विकास अधिकाऱ्यांच्या या निर्णयाचे स्वागत करीत शाळेचे कुलूप उघडले.
धोडराज शाळेला ठोकले कुलूप
By admin | Published: January 11, 2017 2:15 AM