लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली-चिमूर हा ४०० किलोमीटरपेक्षा जास्त पसरलेला लोकसभा मतदार संघ अवघ्या १२ दिवसात पिंजून काढताना उमेदवारांना दम लागणार आहे. असे असताना काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांच्या गोटात अजूनही निवडणुकीचा ‘माहौल’ थंडच आहे. गटातटात विखुरलेले काँग्रेसचे नेते प्रचारापासून दूर असल्याने कार्यकर्त्यांच्या भरोशावर सुरू झालेला प्रचार किती यशस्वी ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.निवडणूक रिंगणातील दोन प्रमुख उमेदवारांपैकी काँग्रेसचे डॉ.नामदेव उसेंडी आणि भाजपचे अशोक नेते यांच्यातच काट्याची लढत आहे. डॉ.उसेंडी यांना उमेदवारी मिळाल्यानंतर उमेदवारीच्या स्पर्धेत असलेले इतर तीनही उमेदवार गायब झाले आहेत. ज्येष्ठ नेते माजी खासदार मारोतराव कोवासे, आ.विजय वडेट्टीवार यांचे निकटवर्तीय असलेले डॉ.नितीन कोडवते आणि अपक्ष नामांकन भरून माघार घेणारे गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ.नामदेव किरसान हे सध्यातरी उसेंडी यांच्या प्रचारात प्रत्यक्ष उतरलेले नाहीत. त्यांना विश्वासात घेऊन कामी लावण्यात अद्याप उसेंडी यांना यश आलेले नाही. अशा स्थितीत त्यांचा एकाकी लढा किती टिकेल, अशी चर्चा सुरू झाली आहे.गेल्या पाच वर्षात डॉ.उसेंडी यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष या नात्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला. पण प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क ठेवण्यात ते मागे पडले. परिणामी ऐन निवडणुकीच्या वेळी मतदार संघातील दोन हजारांवर गावे पिंजून काढणे त्यांच्यासाठी अशक्यप्राय झाले आहे. त्यातच या मतदार संघातील ६ पैकी केवळ ब्रह्मपुरी या एकाच विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे आमदार (विजय वडेट्टीवार) आहे. उर्वरित क्षेत्रात केवळ काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडे आणि तेथील कार्यकर्त्यांकडे जबाबदारी सोपवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. वडेट्टीवार यांच्या निकटवर्तीय असलेल्या काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे वर्धा आणि चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात जबाबदारी सांभाळत आहेत. गडचिरोलीत उमेदवाराला आमची आवश्यकता वाटत नाही, अशी त्यांची खंत आहे. ऐन निवडणुकीत महिला आघाडी नेतृत्वहीन झाली तर महिला कार्यकर्त्यांना सांभाळणार कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे.वडेट्टीवार लक्ष देणार का?या मतदार संघात वर्क्तृत्वाने प्रभावभाली नेते म्हणून आ.विजय वडेट्टीवार यांची प्रतिमा आहे. पण त्यांच्या गटातील डॉ.कोडवते यांना या मतदार संघात उमेदवारी मिळाली नाही. दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यात मात्र त्यांचा पाठींबा असलेल्या बाळू धानोरकर यांना उमेदवारी मिळाल्याने वडेट्टीवार धानोरकर यांच्यासाठी जास्त मेहनत घेतील हे स्पष्ट आहे. अशा स्थितीत ते गडचिरोली-चिमूर मतदार संघासाठी किती वेळ देऊ शकतील याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. तरीही रविवारी (दि.३१) हवाई सफर करत ते गडचिरोली जिल्ह्यात ७ ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत. त्या सभांना किती गर्दी जमते त्यावरूनही लोकांच्या मनातील कौल लक्षात येऊ शकेल.
Lok Sabha Election 2019; उसेंडींच्या गोटात नेत्यांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 11:59 PM
गडचिरोली-चिमूर हा ४०० किलोमीटरपेक्षा जास्त पसरलेला लोकसभा मतदार संघ अवघ्या १२ दिवसात पिंजून काढताना उमेदवारांना दम लागणार आहे. असे असताना काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांच्या गोटात अजूनही निवडणुकीचा ‘माहौल’ थंडच आहे.
ठळक मुद्देमाहौल थंडच : कार्यकर्त्यांच्या भरवशावर सुरू आहे सिरोंचा ते सालेकसापर्यंतचा प्रचार