लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: जिल्ह्यातील अति दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसनसूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या वाघेझरी येथील मतदान केंद्रावर आज सकाळी ११ च्या सुमारास नक्षल्यांनी भुसुरुंगाचा स्फोट केला. यात कुठलीही जिवीत वा वित्त हानी झालेली नाही.या केंद्रावर मतदान सुरू असताना अचानक हा स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने येथे उपस्थित मतदार व पोलिस जवानांत एकच खळबळ उडाली. स्फोटाच्या ठिकाणापासून अवघ्या दोन कि.मी. अंतरावर मतदान केंद्र आहे. या स्फोटामुळे जवळपासच्या मतदान केंद्रांना तातडीने अन्यत्र हलविण्यात आले. या सर्व प्रक्रियेत नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला आहे.काल गट्टा गावात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात दोन जवान जखमी झाले होते.
येथील नाळेकल येथील केंद्रे नक्षल्यांच्या धास्तीपायी १५ कि.मी. दूर असलेल्या ढोलडोंगरी येथील माजी पोलिस पाटलांच्या घरी हलवण्यात आल्याचे वृत्त आहे. तसेच लेकुरबोळीचे नवेझरी येथे भिमनखुजीचे गरापती येथे तर आलोंडीचे पिटेसूर येथे हलवण्यात आले आहे. गोडरीचे केंद्र सोनपूर येथे हलवण्यात आले आहे. नक्षल्यांच्या भितीने प्रशासनाने वेळेवर मतदान केंद्र किमान ४ ते ५ कि.मी. दूर अंतरावर हलवल्याने मतदान विस्कळित व संथ गतीने सुरू आहे. मतदानासाठी मतदारांची धावपळ होत आहे. ही माहिती तालुका निवडणूक अधिकारी नारनवरे यांनी दिली आहे.