मुन्नाभाई बिके यांचे मत : झाडीपट्टी रंगभूमीत व्यसनाधीनतेवर प्रबोधन गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कायद्याने दारूबंदी होऊन २५ वर्षे उलटली. मात्र दारूबंदीऐवजी दारूविक्री व दारू पिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. दारूची व्यसनाधीनता पराकोटीस गेल्याने शेकडो कुटुंबांची वाताहत होत आहे. दारूमुळे जिल्ह्यात सामाजिक, आर्थिक समस्यांमध्ये मोठी वाढ झाली. शिवाय दारूमाफियांच्या गुंडगिरीमुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दारू व्यसनाधीनतेविरूद्ध गावोगावी नाट्यप्रयोग आयोजित करून लोकजागृती हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. यासाठी शासनाने अशा उपक्रमांना प्रोत्साहन द्यावे, असे परखड मत वडसाच्या चक्रधर नाट्यरंगभूमीचे दिग्दर्शक मुन्नाभाई बिके यांनी मुलाखतीदरम्यान व्यक्त केले.
गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीनंतर समाज प्रबोधनासाठी अनेक समाजसेवी संस्था पुढे आल्या. शासनानेही त्यांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. परंतु दारूमुक्त समाजाची निर्मिती काही होऊ शकली नाही. उलट अवैध दारूविक्रेत्यांनी इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारू आणून गडचिरोली जिल्ह्यात अराजकता वाढविली आहे. गुन्हेगारीचे प्रमाणही या अवैध दारूविक्रीमुळे वाढले असून दारूमाफियांच्या या गुंडगिरीमुळे दारू वाहतूक करणाऱ्या गाड्यांना अपघात व दारू पिण्याच्या व्यसनाधीनतेने शेकडो कुटुंब उद्ध्वस्त झाले. या व्यसनाधीनतेवर उपाय फक्त समाजप्रबोधनातूनच होऊ शकतो. गावोगावी नाटक, पथनाट्याद्वारे प्रबोधन केल्यास मतपरिवर्तनाद्वारे दारू पिण्याच्या सवयींवर नियंत्रण येऊन जिल्हा खऱ्या अर्थाने दारूमुक्त होऊ शकेल. ‘पुसेल का अश्रू कुणी?’ हे झाडीपट्टीतील प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारे प्रभावी नाटक आहे. या नाटकात चोरीछुप्या मार्गाने रात्री-बेरात्री गावात दारू कशी आणली जाते, दारूविक्रीतून आलेल्या पैशामुळे समाजात भाडोत्री गुंडांकरवी जरब कशी बसविली जाते. गावच्या सरपंच महिलेच्या नवऱ्याला दारू पाजून तिच्या अवैैध दारूविक्रीस विरोध करण्याच्या भूमिकेमुळे तिला भोगाव्या लागणाऱ्या यातना, दारू वाहतुकीस विरोध करणाऱ्या एका नि:ष्पाप जीवाच्या खूनाचा अंगाचा थरकाप उडविणारा प्रसंग. अण्णाच्या अत्याचाराला कंटाळून सारा गाव एकजूट होतो व दारूविक्री करणाऱ्या अण्णाला संपविले जाते. अंगावर शहारे आणणारा हा प्रसंग मुन्ना बिके यांनी संपूर्ण ताकदीनिशी उभारला आहे. नाटकातील अनेक प्रसंगाद्वारे दारू पिणाऱ्यांचे मतपरिवर्तन व्हावे, इतक्या प्रभावीपणे सादरीकरण केले आहे. नाट्यप्रयोगांसाठी राबणाऱ्या २५ ते ३० कलावंतांचा संच, त्यांचे मानधन, रंगमंच उभारणी यावर येणारा खर्च मोठा आहे. तिकीटविक्री करूनही याची भरपाई होत नाही. यामुळे प्रचंड नुकसान होते. परिणामी दारूविक्रीच्या या चळवळीला मर्यादा येतात. शासनाने अशा उपक्रमांना आर्थिक पाठबळ दिले तर अधिक प्रभावीपणे नाट्यप्रयोग सादर करून दारूमुक्त समाज निर्मिती होऊ शकते.