अधिकृत केंद्रच नाही : प्रतिक्विंटल हजाराचे नुकसान लोकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : गडचिरोली जिल्ह्यात शासनाचे एकही तूर खरेदी केंद्र नाही. त्यामुळे खासगी व्यापारी शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. ५ हजार ५० हमीभाव असताना व्यापारी केवळ ४ हजार रूपये भाव देऊन तूर खरेदी करीत आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच किमान एक तरी तूर खरेदी केंद्र गडचिरोली जिल्ह्यात सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकट्या चामोर्शी तालुक्यात धानाच्या बांधावर व सलग मिळून २ हजार ४०० हेक्टरवर तुरीचे उत्पादन घेतले जाते. मागील वर्षी तुरीला चांगला भाव मिळाला आहे. त्यामुळे यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी तुरीची लागवड केली. तुरीचे उत्पादन प्रचंड प्रमाणात झाले. जिल्ह्यात एकही तूर खरेदी केंद्र नसल्याने खासगी व्यापाऱ्यांना तूर विकल्याशिवाय पर्याय राहत नाही. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाची खरेदी-विक्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत होणे गरजेचे आहे. मात्र चामोर्शी बाजार समितीत धानाशिवाय इतर उत्पादन खरेदी केले जात नाही. खासगी व्यापारी शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता तुरीचे उत्पादन धानासारखे अधिक प्रमाणात होत नसल्याने बाजार समितीद्वारे तूर खरेदी केली जात नसल्याचे सांगितले. दिवसेंदिवस सोयाबीनचा पेरा कमी होऊन तूर व कापसाचा पेरा वाढत चालला आहे. मात्र खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांची लूट व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. जिल्ह्यात खरेदी केंद्र निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी मागणी आहे.
जिल्ह्यातील तूर उत्पादकांची लूट
By admin | Published: May 27, 2017 1:13 AM