ग्रामपंचायतीची विकास कामे मंदावली
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींना शासकीय योजनेतून लाखो रूपयांचा निधी उपलब्ध झाला. या निधीतून रस्ते, नाल्या, समाजभवन व इतर कामे हाती घेण्यात आली. मात्र दमदार पाऊस झाल्याने शेती मशागतीची लगबग वाढली आहे. परिणामी कंत्राटदाराला मजूर मिळत नसल्याने ग्रामपंचायतीची विकास कामे मंदावली आहेत.
दिना धरणाचे खोलीकरण करण्याची मागणी
चामोर्शी : जिल्ह्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प म्हणून दिना प्रकल्पाची ओळख आहे. अनेक वर्षांपासून उपसा करण्यात आला नाही. त्यामुळे जलसाठवणूक क्षमता कमी झाली आहे. तलावाचा उपसा व कालवे दुरूस्तीसाठी निधी मंजूर करण्याची मागणी आहे.
ग्रामीण रस्त्यांसाठी वाढीव निधी द्या
गडचिरोली : जिल्हा परिषदेंतर्गत ग्रामीण रस्ते दुरूस्तीकरीता ३०-५४ शिर्षाअंतर्गत वाढीव ५० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांना रस्ते उपलब्ध होण्यास मदत होईल.
नेट मार्केटींग संस्थांचा धुमाकूळ
गडचिरोली : पैशावर मोठे व्याजदर देण्याची आमिष दाखविणाºया अनेक संस्था सध्या जिल्ह्यात सक्रिय झाल्या आहेत. ग्राहक यांना बळी पडत आहे. अशा संस्थांमुळे ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इंटरनेटद्वारे आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
आश्रमशाळांची
अवस्था चिंताजनक
गडचिरोली : जिल्ह्यातील अनेक आश्रमशाळांची अवस्था चिंताजनक आहे़ कित्येक आश्रमशाळांमध्ये अधिकृत मुख्याध्यापक नाही़ महिला अधिक्षिकांची पदेही रिक्त आहेत़ विद्यार्थ्यांना आवश्यक सूविधा पुरविण्यात येत नाही़
अनेक रूग्णवाहिका नादुरूस्त
गडचिरोली : जिल्ह्यातील प्रत्येक रूग्णालयाला रूग्णवाहिका देण्यात आली आहे. मात्र यातील बहुतांश रूग्णवाहीका नादुरूस्त असून त्या केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. या रूग्णवाहिकांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
भामरागड तालुक्यातील सौरदिव्यांमध्ये बिघाड
भामरागड : अतिदुर्गम भागात असलेल्या भामरागड तालुक्यातील आदिवासी गावात सौर दिवे लावण्यात आले. परंतु अनेक गावात लावण्यात आलेले सौरदिवे नादुरूस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे सौरदिव्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
विटाभट्टीच्या मलब्याने धोका
देसाईगंज : कोरेगाव परिसरातील गाढवी नदीच्या काठावर असलेल्या विटाभट्टी मालकांनी विटाभट्टी लावलेल्या ठिकाणचा मलबा गाढवी नदी पात्रात टाकल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. या भागातील बहुतांश परिसरात गाढवी नदीचे पात्र अतिशय संकुचित झाले आहेत. तसेच गावातील मृत जनावरांना देखील या मलब्यावर फेकत असल्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे.