काही वर्षांपूर्वी शेतकरी शेती व्यवसायासोबतच गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या आदी जनावरे पाळत होते. जनावरांची विष्ठा शेणखत म्हणून शेतीसाठी उपयोगी पडत होती. शेणखतातून शेतीला मोठ्या प्रमाणावर पोषकतत्व मिळत होते. या तत्त्वामुळे शेतीला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचत नव्हती. शिवाय शेतीचा पोत वाढत होता. सोबतच पूर्णपणे निरोगी पिकांपासून शेतकऱ्यांना भाजीपाला व इतरही पिके घेता येत होती. उत्पन्नाचा दर्जा चांगला राहत होता. त्यामुळे पोष्टिक अन्न मिळण्यास मदत व्हायची; परंतु आता परिस्थिती बदलली आहे. पूर्वी खरीप आणि रब्बी पिकावर कोणत्याही रोगाचे आक्रमण झाले तरी शेतकरी स्वतः उपाययोजना करीत होता; परंतु कालांतराने ही पद्धत मोडीत निघाली. आता कोणत्याही गावात हे चित्र दिसत नाही. पीक चांगले राहण्याकरिता रासायनिक खतांचा भरमसाट वापर केला जात आहे, परिणामी जमिनीतील आवश्यक पोषण तत्त्वे नष्ट होत आहेत. जिल्ह्यात धान, सोयाबीन व कापसाचे उत्पादन घेतले जाते. या पिकांच्या वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर केला जातो.
बाॅक्स
हिरवळीच्या खतांबाबत जागृतीचा अभाव
जमिनीचा पाेत कायम राखण्यासाठी जैविक, सेंद्रिय व हिरवळीच्या खतांबाबत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जात नसल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना माहिती नाही. त्यामुळे शेतकरी पैशांची जमवाजमव करून रासायनिक खतांचाच वापर करतात. त्यामुळे जैविक, सेंद्रिय व हिरवळीच्या खतांचा वापर करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याची आवश्यकता आहे.