नगर परिषदेची निर्मिती हाेऊन तीन वर्षांचा कालावधी उलटला. मात्र शहरात साेयी-सुविधा वाढल्या नाहीत. आजही अनेक प्रभागात पिण्याच्या पाण्याची कमतरता आहे. बऱ्याच हातपंपांना पुरेसे पाणी येत नाही. त्यातल्या त्यात अधूनमधून अनेक कारणाने नळयोजना बंद पडत असल्याने, उन्हाळ्यात पाण्याची अडचण भासतेच; पण हिवाळा आणि पावसाळ्यातही मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील किल्ल्याजवळ जिल्हा परिषद शाळेला लागून असलेला हातपंप पूर्णत: जीर्ण व भंगार झाला आहे. अनेकदा मुले येथे दगड व माती टाकतात, अशी अवस्था झाली असतानासुद्धा नगर पालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे. हातपंपाची लवकर दुरुस्ती न केल्यास संबंधित सर्व कर्मचाऱ्यांवर गुन्हे नोंदवून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांनी केली आहे.
बाॅक्स
नगरसेवकांच्या सूचनांची दखलच नाही
शहरातील समस्या साेडविण्याबाबत वारंवार प्रशासनाला सूचना केल्या. परंतु, दुर्लक्षच झाले. येथील जलस्रोतांमध्ये वेळेवर ब्लिचिंग टाकले जात नाही. काही बोअरवेल फार जुने असल्याने त्यात गाळ जमा झाला आहे. झरे बुजल्याने बोअरवेल फ्लशिंग करण्यासाठी या सूचना केल्या होत्या; पण त्याकडेही दुर्लक्षच झाले. वारंवार वीजपुरवठा खंडित हाेत असल्याने पाण्याची टाकी भरत नाही. पिण्याचे पाणी ३ ते ४ दिवस मिळत नाही. यासाठी साैरपंप लावावे, अशी सूचना केली. परंतु, त्याकडेही दुर्लक्षच झाले, असे मिलिंद खाेब्रागडे यांनी म्हटले आहे. पाण्याची समस्या असतानाही बंद पडलेले हातपंप दुरुस्त केले जात नसल्याने स्थानिक नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
240921\45041931-img-20210924-wa0003.jpg
आरमोरी शहरातील नादुरुस्त असलेले हातपंप