गडचिराेली : जिल्ह्यात तीनही विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार, २० नाेव्हेंबर राेजी मतदान प्रक्रिया पार पडली. लाेकशाहीच्या उत्सवात नागरिकांनी हिरीरीने सहभाग घेऊन मतदानासाठी बुथच्या बाहेर रांगा लावल्या. व्यापारी, दुकानदारांनीही आपली दुकाने बंद ठेवून मतदान कर्तव्यासाठी सुट्टीच घेतलेली हाेती. बहुतांश प्रतिष्ठाने बंद हाेती. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला.
जिल्ह्यात सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ आहे. जिल्ह्यातील बहुतांश भाग नक्षलप्रभावित व अतिशय दुर्गम असल्याने दुपारी ३ वाजेच्या आत मतदान प्रक्रिया पार पाडणे गरजेचे आहे. यासाठी सकाळी ७ वाजतापासूनच मतदान बुथच्या बाहेर मतदारांनी मतदान कर्तव्य बजावण्यासाठी रांगा लावल्या. गडचिराेली शहरासह तालुक्यातील मतदार आपले कर्तव्य पार पाडण्याच्या कामात व्यस्त राहणार, ही बाब जाणून व्यापारी, व्यावसायिक व अन्य दुकानदारांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली हाेती. शहरातील मुख्य मार्कट ते आठवडी बाजार चाैक रस्त्यावरील दुकाने शटडाऊन हाेती. याशिवाय चंद्रपूर मार्गालगतच्या पेट्राेल पंप परिसरातील सुपर मार्केट परिसरातील दुकानेसुद्धा बंद हाेती. आरमाेरी, अहेरी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या तालुका मुख्यालयातसुद्धा हीच स्थिती पाहायला मिळाली.
आठवडी बाजारही बंद
जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली हाेती. याशिवाय बुधवारी भरविले जाणारे आठवडी बाजारही बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले हाेते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या सूचनेचे पालन तंताेतंत करण्यात आले.
अत्यावश्यक सेवा मात्र सुरू
विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी सार्वजनिक सुट्टी हाेती. त्यामुळे शासकीय कार्यालयांसह खासगी प्रतिष्ठानेही बंद हाेती.मात्र, अत्यावश्यक सेवेतील रुग्णालय, भाजीपाल्याची दुकाने आदी सुरू हाेती. रुग्णालयातील बाह्य रुग्णसेवासुद्धा बंद इेवण्यात आलेली हाेती.