१२ वी फेरी : नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनी कथन केले अनुभवगडचिरोली : आपला महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत फार पुढे गेला आहे, हे आम्हाला गडचिरोलीतील दुर्गम भागात राहून कधीच कळले नाही. शासनाच्या महाराष्ट्र दर्शन सहलीच्या माध्यमातून महाराष्ट्राची झालेली प्रगती प्रत्यक्ष पाहता आली. तसेच शिक्षणामुळे दुर्गम भागात राहूनही प्रगती साध्य करता येऊ शकते, असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे, असे मनोगत महाराष्ट्र दर्शन सहल करून आलेल्या विद्यार्थ्यांनी गडचिरोली येथील समारोपीय कार्यक्रमामध्ये व्यक्त केला.समारोपीय कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, पोलीस उपनिरिक्षक शहादेव पालवे, विजय महाले उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान आमच्याकडे घनदाट जंगल आहेत. दूरवर शाळा आहेत. जंगलातून रोजची पायपीट होते. दळणवळणाची साधने म्हणून शासनाच्या एस.टी. बसेसवरच अवलंबून राहावे लागते. आश्रमशाळांच्या माध्यमातून शिक्षणाची सोय झाली आहे. मात्र गडचिरोलीच्या बाहेर निघून इतर शहरांनी कशी प्रगती केली, हे कधीच पहायला मिळाले नव्हते. शासनाने महाराष्ट्र दर्शन सहल आयोजित केल्यामुळे आमचे महाराष्ट्र दर्शनाचे स्वप्न पूर्ण झाले. या सहलीतून महाराष्ट्राची झालेली प्रगती जवळून बघता आली. त्यामुळे उच्च शिक्षण घेऊन आपली व गडचिरोली जिल्ह्याच्या प्रगतीसाठी हातभार लावण्याची प्रेरणा आम्हाला या सहलीच्या माध्यमातून मिळाली असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती सहल योजनेच्या माध्यमातून गडचिरोली पोलिसांनी नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचे दर्शन घडविले. सहलीच्या शेवटच्या टप्प्यात गडचिरोलीतील आदिवासी विद्यार्थ्यांनी नागपूर शहरातील विविध स्थळांना भेटी देऊन नागपूरसोबतच राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद या विविध शहरातील शैक्षणिक तसेच औद्योगिक प्रगती व विकासाची माहिती घेऊन महाराष्ट्र दर्शनाचा लाभ घेतला.यापूर्वी आम्ही कधी रेल्वेत बसलो नसल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले. शासन व पोलिसांनी ही संधी उपलब्ध करून दिल्याने सहलीच्या माध्यमातून महाराष्ट्राचा शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक असा झालेला विकास अनुभवता आला. याचा भविष्यात आम्हाला नक्कीच उपयोग होईल, असा आत्मविश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. नागपूर येथील सहलीच्या यशासाठी नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक शिवाजी बोडखे, अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य शमशेर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास सुपे, सहायक पोलीस निरीक्षक मनोज बहुरे, पोलीस उपनिरीक्षक तथा प्रशासन अधिकारी दादा ईश्वरकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनकर चांभारे यांनी परिश्रम घेतले.७९ विद्यार्थ्यांनी येथे दिल्या भेटी४महाराष्ट्र पोलिसांतर्फे सुरू करण्यात आलेल्या सहलीच्या उपक्रमाचा हा १२वा टप्पा होता. या सहलीत गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील ४२ मुले व ३७ मुली असे एकूण ७९ विद्यार्थी सहभागी झाले होते. यात नक्षलपीडित कुटुंबातील आणि नक्षल सदस्य असलेल्या कुटुंबातील नऊ विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी या विद्यार्थ्यांनी मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर अशा विविध शहरांना भेटी देऊन त्या शहरांचा झालेला विकास बघितला तसेच माहिती जाणून घेतली. ४राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद आदी शहरांना भेटी देऊन विद्यार्थ्यांची ही सहल नागपुरात दाखल झाली. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी दोन दिवसांत शहरातील क्रेझी कॅसल वॉटर पार्क, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, दीक्षाभूमी, विधान भवनाजवळील वस्तुसंग्रहालय, रमण विज्ञान केंद्र या ठिकाणी भेटी देऊन विविध माहिती जाणून घेतली.
महाराष्ट्र दर्शनाने विद्यार्थी भारावले
By admin | Published: May 17, 2016 1:02 AM