लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामातून जिल्हाभरात एकूण ७ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यात आरमोरी विधानसभा क्षेत्रातील पाच, तर गडचिरोली व अहेरी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे. त्यामुळे आता ३७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक आहेत. त्यापैकी गडचिरोलीत सर्वाधिक १६, आरमोरी विधानसभा क्षेत्रात १२ आणि अहेरी विधानसभा क्षेत्रात ९ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.गडचिरोली विधानसभा क्षेत्रात १७ उमेदवारांनी नामांकन सादर केले होते. पडताळणीच्या वेळी १७ ही नामांकन वैध ठरले. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यामुळे नेमके कोण-कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार आहे, याकडे मतदार व उमेदवारांचे लक्ष लागले होते. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून अपक्ष उमेदवार मंसाराम माधव आत्राम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे गडचिरोली विधानसभा क्षेत्रात १६ उमेदवार रिंगणात आहेत. आरमोरी विधानसभा क्षेत्रातील १७ पैकी ५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता १२ उमेदवार रिंगणात आहेत. अहेरी विधानसभा क्षेत्रात १० पैकी एकाने अर्ज मागे घेतल्याने ९ उमेदवार शिल्लक आहेत.उमेदवारांना सोमवारी रात्री उशिरापर्यंत निवडणूक चिन्हांचे वितरण करण्यात आले. चिन्ह निश्चित असणाऱ्या राजकीय पक्षांनी अगोदरच प्रचार साहित्य छापले. मात्र अपक्ष उमेदवार आता चिन्ह मिळाल्यानंतर प्रचार साहित्य छापून मंगळवारपासून प्रचाराला लागणार आहेत. मंगळवारी दसरा असल्याने बुधवारपासूनच खऱ्याअर्थाने प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल.
यांनी घेतले उमेदवारी अर्ज मागेआरमोरी विधानसभा क्षेत्रातून अपक्ष उमेदवार शरद यादवराव सोनकुसरे, नीताराम झिंगरराव कुमरे, अनिल पुंडलिक कुमरे, वामन वंगणूजी सावसाकडे, रमेश गोविंदा मानागडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून अपक्ष उमेदवार मंसाराम माधव आत्राम व अहेरी विधानसभा क्षेत्रातून अपक्ष उमेदवार संदीप मारोती कोरेत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यावर्षी उमेदवारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे लढती रंगतदार होण्याची शक्यता आहे.