लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातल्या तीन विधानसभा मतदार संघांपैकी अहेरी वगळता गडचिरोली आणि आरमोरी मतदार संघांमधील सर्व उमेदवारांचे नामांकन वैध ठरले आहेत. केवळ अहेरी मतदार संघातून तीन उमेदवारांचे नामांकन बाद झाले. त्यामुळे आता ४४ जण शिल्लक असून त्यांना माघार घेण्यासाठी सोमवार दि.७ रोजी दुपारी ३ पर्यंत मुदत राहणार आहे.अहेरी मतदार संघात ३ उमेदवारांचे नामांकन वेगवेगळ्या त्रुटींमुळे बाद ठरले. त्यामुळे या मतदार संघात १३ पैकी १० उमेदवार शिल्लक आहेत. गडचिरोली आणि आरमोरी मतदार संघात प्रत्येकी १७ उमेदवार रिंगणात कायम आहेत.सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना निवडणुकीतून माघार घेता येणार आहे. ३ वाजतानंतर रिंगणात शिल्लक राहिलेल्या उमेदवारांना त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत चिन्हांचे वाटप होईल. त्यामुळे मंगळवार दि.८ पासून खऱ्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. आता कोण रिंगणात कायम राहणार आणि कोण माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तीनही मतदार संघांमध्ये भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांसह बसपा, वंचित बहुजन आघाडी, शेकाप या पक्षांचेही उमेदवार असल्यामुळे रंगत वाढणार आहे. मात्र बहुतांश ठिकाणी दुहेरी किंवा तिहेरी लढतच राहणार आहे.प्रचारासाठी मिळणार अवघे १२ दिवससोमवारी संध्याकाळपर्यंत अधिकृत चिन्ह मिळाल्यानंतर उमेदवारांचा प्रचार सुरू होईल. प्रत्यक्ष मतदारांपर्यंत जाऊन प्रचार करण्याठी उमेदवारांना अवघे १२ दिवस मिळणार आहेत. त्यातच ४ ते ५ दिवस पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रचारसभा घेणेही कठीण होणार आहे. त्यामुळे अल्पावधीत मतदारांपर्यंत आपला प्रचार पोहोचण्यासाठी विश्वसनिय माध्यम म्हणून वृत्तपत्रीय जाहीरातींचा आधार उमेदवारांकडून वाढण्याची शक्यता आहे.
Maharashtra Election 2019 ; केवळ तीन नामांकन बाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2019 6:00 AM
अहेरी मतदार संघात ३ उमेदवारांचे नामांकन वेगवेगळ्या त्रुटींमुळे बाद ठरले. त्यामुळे या मतदार संघात १३ पैकी १० उमेदवार शिल्लक आहेत. गडचिरोली आणि आरमोरी मतदार संघात प्रत्येकी १७ उमेदवार रिंगणात कायम आहेत.
ठळक मुद्दे४४ जणांचे अर्ज वैध । सोमवारपर्यंत माघार घेण्याची मुदत, चिन्हवाटपही होणार