लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : विधानसभा निवडणूक दारूमुक्त होण्यासाठी मुक्तिपथद्वारे तालुक्यातील पोलीस पाटलांची बैठक पोलीस ठाण्यात घेण्यात आली. या बैठकीत दारूमुक्त निवडणूक व्हावी यासाठी विविध मुद्यावर चर्चा झाली. दारूमुक्त निवडणुकीसाठी पुढाकार घेत या काळात गावांमध्ये दारूचा वापर होणार नाही यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्णय पोलीस पाटलांनी यावेळी घेतला.विधानसभा निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटनांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. याच आवाहनाला प्रतिसाद देत अनेक गावांनी पुढाकार घेतला आहे. रॅली काढून जनजागृती केली जात आहे. निवडणूक काळात लोकांना दारूचे आमिष देऊन त्यांचे अमूल्य मत विकत घेण्याचा प्रकार बरेचदा घडतो. गडचिरोली जिल्हाही याला अपवाद नाही. असे झाल्यास गावांनी परिश्रमाने टिकवून ठेवलेली दारूबंदी निकामी ठरते. निवडणूक काळात गावात दारू येणार नाही यासाठी पोलीस पाटलांची जबाबदारी महत्त्वाची ठरते. त्यामुळे पोलीस पाटलांनी पुढाकार घेत विशेष प्रयत्न करावे, यासाठी तालुक्यातील पोलीस पाटलांची बैठक मुलचेरा पोलीस ठाण्यात घेण्यात आली.या बैठकीला तालुक्यातील ३५ गावांचे २७ पोलीस पाटील उपस्थित होते. निवडणूक काळात गावात दारू येणार नाही, यासाठी गावांच्या मदतीने लक्ष ठेवून राहणार असल्याचा निर्णय पोलीस पाटलांनी घेतला. त्याचबरोबर गावांमध्ये दारूमुक्त निवडणुकीसाठी रॅली काढून जनजागृती करणार असल्याचेही ते म्हणाले.येथील ठाणेदार मिलिंद पाठक यांनीही पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले. या काळात गावात दारू येणार नाही याची काळजी घ्या. कुणीही संशयित आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवा. गाव संघटनांचे सहकार्य घ्या. भांडण तंटे होऊन गावातील शांतता भंग झाल्यास पोलीस पाटीलकी जाईल, असा इशाराही पाठक यांनी दिला. मुक्तिपथ तालुका उपसंघटक आनंद सिडाम आणि प्रेरक प्रताप मंडल यांनी बैठकीसाठी सहकार्य केले. यावेळी बहुसंख्य पोलीस पाटील हजर होते.
Maharashtra Election 2019 : दारूमुक्त निवडणुकीसाठी पोलीस पाटलांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 12:32 AM
विधानसभा निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटनांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. याच आवाहनाला प्रतिसाद देत अनेक गावांनी पुढाकार घेतला आहे. रॅली काढून जनजागृती केली जात आहे. निवडणूक काळात लोकांना दारूचे आमिष देऊन त्यांचे अमूल्य मत विकत घेण्याचा प्रकार बरेचदा घडतो. गडचिरोली जिल्हाही याला अपवाद नाही.
ठळक मुद्देमुलचेरा पोलीस ठाण्यात बैठक : गावागावात रॅली काढणार