अतुल बुराडे/विष्णू दुनेदार ।लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा/तुळशी : आरमोरी या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या विधानसभा मतदारसंघात सन १९६२ पासून आजपर्यंत राज्य विधानसभेसाठी १२ सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. यातून निवडून आलेले सर्व १२ ही आमदार हे पुरुषच होते. सन १९६२ पासूनच्या निवडणुकांचा आढावा घेतला असता ५८ वर्षांच्या काळात फक्त दोन महिलांनी आरमोरी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीसाठी निवडणूक लढवल्याचे दिसून येते.आजपर्यंत एकाही महिला उमेदवाराला आरमोरी विधानसभा क्षेत्रातून आमदार होण्याचा बहुमान मिळालेला नाही. यावेळच्या सार्वत्रिक निवडणुकीतही आरमोरी विधानसभा मतदारसंघातून कोणत्याही महिला उमेदवाराने निवडणूक लढण्यासाठी नामांकन दाखल केलेले नाही.आरमोरी विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्यावहिल्या सन १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून ते सन १९९५ पर्यंतच्या तब्बल ३४ वर्षांच्या कालावधीत झालेल्या एकूण आठ निवडणुकींमध्ये प्रथमच १९९५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत एका महिला उमेदवाराने आरमोरी विधानसभा मतदारसंघातून प्रथमच आमदार होण्याचे स्वप्न उराशी बाळगत निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली होती. ती महिला उमेदवार होती रजनी बळीराम वरठे. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (खोब्रागडे) या पक्षाकडून वरठे यांनी निवडणूक लढली. त्यावेळच्या निवडणुकीत १९ उमेदवारांमध्ये त्या एकमेव महिला उमेदवार होत्या. पण त्यांना अवघी १०९४ मते मिळाली. त्या निवडणुकीत शिवसेनेच्या रामकृष्ण हरी मडावी यांनी बाजी मारली. मडावी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार आनंदराव गेडाम यांचा १३ हजार ४४८ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत महिला उमेदवार रजनी वरठे पराभूत झाल्या असल्या तरी आरमोरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच एक महिला म्हणून लढण्याचा मान त्यांना प्राप्त झाला.त्यानंतरच्या सन १९९९, सन २००४ आणि सन २००९ मध्ये झालेल्या तीनही निवडणुकीत एकही महिला उमेदवार निवडणूक लढली नाही. सन १९९५ पासून पुन्हा १९ वर्षानंतर, म्हणजे २०१४ ला दुसऱ्यांदा एका महिलेने निवडणूक लढली. त्या महिला उमेदवार होत्या कोमल रवी बारसागडे (ताडाम). बहुजन समाज पार्टीने त्यांना उमेदवारी दिली होती. त्यांना १५ हजार ६९७ एवढी मते मिळाली होती. पण त्यांना विजयश्री गाठता आली नाही. त्यावेळी प्रथमच भारतीय जनता पक्षाकडून लढलेले कृष्णा गजबे यांनी दोन वेळा आमदार राहिलेल्या काँग्रेसच्या आनंदराव गेडाम यांचा १२ हजार ७३३ मतांनी पराभव केला.या मतदारसंघात सन १९६२ पासून आजपर्यंतच्या ५८ वर्षांत झालेल्या एकूण १२ निवडणुकांमध्ये ९२ उमेदवारांनी निवडणूक लढली. त्यात तब्बल ८९ उमेदवार पुरुष तर फक्त दोन उमेदवार महिला होत्या.
Maharashtra Election 2019 ; आतापर्यंत फक्त दोनच महिलांनी लढविला निवडणुकीचा आखाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 6:00 AM
आजपर्यंत एकाही महिला उमेदवाराला आरमोरी विधानसभा क्षेत्रातून आमदार होण्याचा बहुमान मिळालेला नाही. यावेळच्या सार्वत्रिक निवडणुकीतही आरमोरी विधानसभा मतदारसंघातून कोणत्याही महिला उमेदवाराने निवडणूक लढण्यासाठी नामांकन दाखल केलेले नाही.
ठळक मुद्देआरमोरी विधानसभा मतदारसंघ : एकूण १२ निवडणुकांमध्ये ९२ जण रिंगणात