गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील कसनेलीच्या जंगलात झालेल्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास कसनेलीच्या जंगलात सी -६० कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. ही चकमक अद्यापही सुरू असल्याची माहिती मिळात आहे. सी-६० कमांडोंनी नक्षलविरोधी अभियान राबवित असताना ही कारवाई करण्यात आली. या अभियानादरम्यान नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. यावेळी प्रत्युत्तरादाखल जवानांनी गोळीबार केला. या गोळीबारात पाच नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक उडाली होती. यामध्ये दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. कारेची तालुक्यातील ग्यारापत्ती जंगलात रविवारी (15 सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास ही चकमक उडाली होती. दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात अलिकडच्या काही वर्षात नक्षल चळवळ खिळखिळी झाली आहे. गेल्या दोन वर्षात जवळपास ९० हून अधिक सशस्त्र नक्षलवादी आणि त्यांच्या नेत्यांनी आत्मसमर्पण केले आहे.