लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी मागील महिन्यापावेतो आपले आधार प्रमाणीकरण केले अशा १४ हजार ८४१ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४७ कोटी ३० लाख रुपये एवढी रक्कम शासनाने जमा केली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत शेतकऱ्यांना आनंदाची वार्ता मिळाला आहे.
जिल्ह्यातील १२३ शेतकऱ्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्यात ४८ लाख रुपये जमा करण्यात आले. या प्रोत्साहनपर लाभ योजनेसाठी ग जिल्ह्यातील ११२ शेतकऱ्यांनी अद्याप आपले आधार प्रमाणिकरण केले नाही. अशा शेतकऱ्यांनी नजीकच्या सुविधा केंद्र अथवा आपल्या बँक शाखेत आपले आधार प्रमाणिकीकरण करुन घ्यावे असे आवाहन शासनाने केले आहे.
या योजनेमध्ये सन २०१७-२०१, २०१८-२०१९, २०१९-२०२० या तीन वर्षांमध्ये कोणत्याही दोन वर्षांत बँकेकडून पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केली आहे अशा एकूण १४ हजार ८४१ हजार शेतकऱ्यांना आज पर्यंत एकूण ४७.३० कोटी रुपये लाभ देण्यात आला आहे, असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी कळविले आहे. दरम्यान, नियमित कर्जभरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत लाभ भेटल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
५० हजार रुपयांची मर्यादा प्रोत्साहनपर लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक किवा अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन ५० हजार रुपये या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ रक्कम निश्चित करण्यात आले आहे.
यांना मिळणार नाही योजनेचा लाभ महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त्ती योजना २०१९ अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी. आजी-माजी आमदार, खासदार, मंत्री केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी/ कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये २५ हजार रुपयांपेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून), राज्य सार्वजनिक उपक्रम (उदा. महावितरण, एस टी महामंडळ इ.) व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रुपये २५ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, अशांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.