लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील नऊ नगरपंचायतींवर ज्या पद्धतीने महाविकास आघाडीतील पक्षांनी आणि विशेषत: काँग्रेस आणि शिवसेनेने आपला झेंडा फडकविला, ते पाहून जिल्ह्याचे राजकीय वातावरण बदलत असल्याची जाणीव सध्या होत आहे. गेल्या सात वर्षांपासून जिल्ह्यावर भाजपचे वर्चस्व आहे; पण नगरपंचायतींच्या निकालांनी या वर्चस्वाला सुरूंग लावला आहे. काँग्रेसचे नेते तथा बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांचे मार्गदर्शन, नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला दिलेले बळ यामुळेच या दोन्ही पक्षांनी सत्तेच्या दिशेने झेप घेतली आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून सतत पुढे जात असलेला भाजपचा विजयरथ नगरपंचायतच्या निकालाने रोखला आहे. सात वर्षांत लोकसभा, विधानसभा निवडणुकांसोबत नगरपरिषद, नगरपंचायत, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेतही बऱ्यापैकी वर्चस्व निर्माण करण्यात भाजपला यश मिळाले आहे; पण राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार आल्यानंतर शिवसेनेसोबत काँग्रेसनेही संघटनात्मक फेरबदल केले. विजय वडेट्टीवार, एकनाथ शिंदे यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात काँग्रेस आणि शिवसेनेने जी व्यूहरचना केली, त्यातून या दोन्ही पक्षांनी यश खेचून आणले. त्यात शिवसेनेचे जिल्हा समन्वयक किरण पांडव यांनी मुलचेरा येथे अविरोध, तर कुरखेडा येथे भाजपचे प्राबल्य असताना शिवसेनेचा नगराध्यक्ष बसवून धमाल उडवून दिली. यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नाममात्र अस्तित्व असणाऱ्या सेनेने मारलेली ही मुसंडी पक्षाला बळकटी देणारी ठरणार आहे.दक्षिण गडचिरोलीत उदयास आलेल्या आदिवासी विद्यार्थी संघालाही या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले. माजी आमदार दीपक आत्राम हे संस्थापक असले तरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या खेळीमुळे मोठ्या पक्षांना मागे टाकत ‘आविसं’ने दोन ठिकाणचे नगराध्यक्षपद आणि तीन ठिकाणी उपाध्यक्षपद पदरी पाडून घेतले आहे.
काँग्रेसला नवसंजीवनीजिल्ह्यात कमजोर होत चाललेल्या काँग्रेस पक्षाला मंत्री विजय वडेट्टीवारांमुळे पुन्हा उभारी मिळत आहे. युवा जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनीही नव्या दमाची फळी तयार करून काँग्रेसमधील मरगळ दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी असली तरी त्याला आता फारसे महत्त्व न देता जुने- नवे पदाधिकारी सोबत काम करताना दिसत आहेत.
भाजप कुठे कमी पडली?
राज्यात सत्तेवरून दूर झाल्यानंतर भाजपला आपले प्रभावक्षेत्र टिकवून ठेवणे कठीण झाले. त्यात विरोधक जास्त सक्रिय झाल्यामुळे भाजपला त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे खासदार, दोन आमदार असतानाही भाजपला अपयशाचा सामना करावा लागला आहे.