लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येत्या १५ आणि १७ जानेवारी अशा दोन टप्प्यात होऊ घातलेल्या जिल्ह्यातील ३६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रितपणे लढण्याबाबतचा निर्णय अजून झालेला नाही. त्यामुळे सध्यातरी या आघाडीवर अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे हे तीनही पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. ग्रामपंचायत निवडणुका पक्षीय चिन्हावर होत नसल्या तरी ही निवडणूक लढणारे स्थानिक कार्यकर्ते कोणत्या ना कोणत्या पक्षाशी जवळीकता ठेवून असतात. त्यामुळे त्या पक्षाची ताकद, नेत्यांचे पाठबळ मिळून विजयश्री खेचून आणणे सुकर होण्यासाठी अनेक जण पक्षीय पाठबळ मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे ज्या गावात ज्याचा दबदबा आहे अशा नागरिकांना हेरून त्यांनाच आपल्या पक्षाकडून रिंगणात उतरवण्यासाठी काही पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रितपणे लढण्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांचे वरच्या स्तरावर प्रयत्न आहेत. त्याची नगर पंचायत निवडणुकीत अंमलबजावणीही होण्याची शक्यता आहे. पण ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचे सूर जुळणे कठीणच असल्याचे एकूण परिस्थितीवरून दिसून येते. अशा स्थितीत ही निवडणुकीत पक्षापेक्षा व्यक्तीकेंद्रीत होण्याची शक्यता जास्त आहे.
- तर इच्छुकांची गोची होणारनिवडणुकीसाठी शिल्लक असलेला कालावधी पाहता महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित बसून ३६२ ग्रामपंचायतीमधील उमेदवार निश्चित करणे जवळजवळ अशक्य आहे. तरीही आघाडीतील घटक पक्षांनी एकत्रितपणे लढायचे असा निर्णय झाल्यास गुडघ्याला बाशिंग बांधून असणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा हिरमोड होणार आहे.
स्थानिक संस्थांमध्ये भाजपचा दबदबाजिल्ह्याची एकूण स्थिती पाहता गडचिरोली आणि आरमोरी विधानसभा क्षेत्रासह स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपचा बऱ्यापैकी दबदबा आहे तर दक्षिण भागात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक ठिकाणी वर्चस्व आहे. त्यामुळे वरकरणी भाजपशी जवळीकता ठेवणाऱ्यांसाठी ही निवडणूक अधिक सोपी राहील, असे मानले जाते.
विधान परिषदेतून झाली रंगीत तालीमनुकत्याच झालेल्या पदवीधर मतदार संघाच्या वि.प.निवडणुकीत भाजपला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. अर्थात त्या पराभवात गडचिरोली जिल्ह्याचा वाटा कमी असला तरी मतदारांचा कल कुणीकडे झुकत आहे याचा अंदाज या निवडणुकीतून आला. त्यामुळे भाजपच्या वर्चस्वाला धक्का तर लागणार नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
शिवसेनेत वर्चस्वाची लढाईजिल्ह्यात सध्या शिवसेनेत कोणाचा पायपोस कोणात नाही. पदाधिकाऱ्यांनी वर्चस्वावरून एकमेकांविरूद्ध उघड बंड पुकारले आहे. कोण खरा आणि कोण खोटा, या संभ्रमात सामान्य शिवसैनिक पिचून गेला आहे. नेतृत्वावरून सुरू झालेल्या या गटबाजीचा सेनेला ग्रा.पं. निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे.