लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: अति मागास व दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातल्या मुधोली चेक येथील एका युवकाने आर्थिक प्रतिकूलतेवर मात करून पीएचडी पदवी संपादित केली आहे. पुण्याच्या गोखले इन्स्टीट्यूटमध्ये त्याने आपली पीएचडी केली आहे हे विशेष.जिथे साधे स्वच्छ पाणी नाही, वीजपुरवठा नियमित नाही, रस्ता नाही, बसवाहतूक नियमित नाही, अशा गावात राहणाऱ्या महेंद्र वर्धलवार या युवकाची ही कथा विलक्षण आहे.
लहानपणापासूनच शिक्षणाची गोडी असलेल्या महेंद्रने अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. त्याने नेट व सेट परीक्षाही उत्तीर्ण केली होती. मात्र त्याला कुठेही नोकरी मिळाली नाही. तरीही खचून न जाता त्याने गोखले इन्स्टीट्यूट ऑफ पॉलिटिक्स अॅन्ड इकॉनॉमिक्स या संस्थेत शासकीय योजना आणि अधिकारी विकास या विषयावर अभ्यासाला प्रारंभ केला. त्यासाठी त्याला दिल्लीच्या आयसीएसएसआरची १७ हजारांची शिष्यवृत्ती मिळाली. त्याने अथक परिश्रम घेऊन इंग्रजी भाषेवर प्रभुत्व प्राप्त केले व आपली पीएचडी पूर्ण केली.त्याने आपल्या यशाचे श्रेय आईवडील, भाऊ, शिक्षक, मार्गदर्शक व येणापूर येथील वर्गमित्रांना दिले आहे.