कोरची, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, आरमोरी, गडचिरोली, मुलचेरात महिला सभापती गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील सर्व बारा पंचायत समित्यांमधील सभापती पदाच्या जागा निश्चित करण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात विशेष सभा बोलावून सोडत पध्दतीने आरक्षण काढण्यात आले. बारा पैकी सात पंचायत समित्यांचे सभापती पद महिलांसाठी राखीव करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पंचायत समित्यांवर महिलाराज येणार आहे. महिलांसाठी सभापती पद आरक्षित झालेल्या पंचायत समित्यांमध्ये कोरची, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, गडचिरोली आरमोरी व मुलचेरा आदींचा समावेश आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी शैलेंद्र मेश्राम, नायब तहसीलदार दहीकर व राऊत यांनी आरक्षण सोडतीची कार्यवाही पार पाडली. सभेला गडचिरोली पं.स.चे सभापती देवेंद्र भांडेकर, पंस. सदस्य अमिता मडावी, पुरूषोत्तम गायकवाड यांच्यासह पंचायत समिती क्षेत्रातील विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व नेते उपस्थित होते. सभापतींच्या १२ पदापैकी आठ जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्या असून यात पाच महिलांसाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जातीकरिता एक, नामाप्रसाठी दोन व सर्वसाधारण प्रवर्गासाठी एक जागा आरक्षित करण्यात आली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
पंचायत समितीवर येणार महिलाराज
By admin | Published: January 11, 2017 2:09 AM