गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात उन्हाळ्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या मोहाफुलांना आता खऱ्या अर्थाने भाव येणार आहे. या फुलांपासून अधिकृतपणे मद्यनिर्मिती करण्याचा निर्णय यापूर्वीच मंत्रिमंडळ बैठकीत झाला होता. गुरुवारी (दि.२३) त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. त्यात या देशी मद्याचे विदेशीकरण करण्यामागील भूमिकाही स्पष्ट करण्यात आली.
एकीकडे विदेशी मद्याचा दर्जा, तर दुसरीकडे किमतीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जाणार आहे. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर आकारण्यात येणारा उत्पादन शुल्काचा दर जास्त आहे. त्यामुळे मोहाफुलांपासून निर्मिती होणाऱ्या ‘विदेशी’ मद्यावर हा दर आकारल्यास मद्याची विक्री किंमत जास्त होईल. त्यातून मद्याच्या विक्रीवर मर्यादा येतील. हे टाळण्यासाठी उत्पादन शुल्क सवलतीच्या दरात आकारले जाणार आहे.
म्हणून देशीला केले विदेशी मद्य
वास्तविक मोहाफुलाच्या मद्यार्कापासून बनविण्यात येणारे मद्य हे देशी मद्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. पण यामुळे त्याला मर्यादित ग्राहक वर्ग उपलब्ध होऊन त्याच्या विक्रीवर, किमतीवर मर्यादा येईल. त्यामुळे मोहाफुलाच्या दारूला देशीऐवजी विदेशी मद्य असा दर्जा देणे योग्य असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. मात्र त्यास ‘स्थानिक मद्य’ असे संबोधण्याचा निर्णय घेण्यात आला. यानिमित्ताने ग्रामीण भागात लोकप्रिय असलेल्या मोहाच्या दारूला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
ब्रँडीप्रमाणे लागणार अनुज्ञप्ती शुल्क
द्राक्षापासून तयार केलेल्या मद्यार्कावर आधारित ब्रँडी या मद्य प्रकारासाठी पीएलएल अनुज्ञप्ती शुल्क आकारले जाते. मोहाफुलांच्या मद्यार्कापासून पेय मद्य बनविण्याकरिता हेच शुल्क आकारले जाणार आहे.
मोहाफुलात मिसळता येणार इतर फुलांचा अर्क
मोहाफुलांपासून बनविल्या जाणाऱ्या मद्यार्कासाठी पुरेशा प्रमाणात फुले उपलब्ध न झाल्यास दुसरी फुले किंवा फळांपासून उत्पादित मद्यार्क मिश्रण करण्यास मुभा राहणार आहे. मात्र मळी किंवा धान्यावर आधारित मद्यार्काचे मिश्रण त्यात करता येणार नाही. याचा फायदा घेऊन किमतीने कमी असलेल्या फुलांचा मद्यार्क या मोहफुलाच्या दारूत मिसळला जाण्याची शक्यता आहे.