भरपूर उत्पन्न देणारे पीक म्हणून अनेक शेतकरी मका पिकवू लागले आहेत. उपप्रादेशिक कार्यालय आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत धानोरा येथे १७ जून रोजी डाॅ. देवराव होळी यांच्या हस्ते येथील महसूल विभागाच्या शासकीय गुदामात मका खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. आठ दिवसात तीन हजार ८२ क्विंटल मका खरेदी करण्यात आली. एवढ्याच खरेदीने गुदाम फुल्ल झाले. त्यामुळे मका ठेवण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने मक्याची खरेदीच बंद ठेवण्यात आली आहे. आठ दिवसांच्या कालावधीत तालुक्यातील केवळ २० टक्केच मका खरेदी करण्यात आला आहे. ८० टक्के मका अजूनही शेतकऱ्यांकडेच आहे. एवढाच मका खरेदी करायचा हाेता तर केंद्र का सुरू करण्यात आले, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विनोद लेनगुरे, रामेशवरी नरोटे, गोवर्धन कुदराम, प्रशांत टिकले, अविनाश पवार, गायदं पवार, गवचंद समरथ, प्रवीण देहारी, मनीष पवार, जीवन आतला, बावसू आतला, शिवराम अलवळवार, केशव आतला, मेहताप कुदराम, उमाजी कुदराम, पंकज समरथ, महेश रोहकिया आदी उपस्थित होते. याबाबत आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक धीरज चाैधरी यांना विचारणा केली असता, शासनाने तीन हजार क्विंटल मका खरेदीची परवानगी दिली हाेती. ती संपल्याने खरेदी बंद करण्यात आली आहे, अशी माहिती दिली.
बाॅक्स
चार दिवसांपासून शेतकऱ्यांचा केंद्रावर मुक्काम
मुरूमगाव, पेंढरी, धानोरा परिसरातील शेतकऱ्यांनी भाड्याचे वाहन करून मका धानाेरा येथे आणला आहे. पावसाळ्याचे दिवस असतानाही ते मुक्कामी आहेत. केंद्राच्या आवारात स्वयंपाक करून खात आहेत. आपला नंबर येण्याची वाट बघत आहेत. अशातच गुदाम फुल्ल झाल्याने खरेदी बंद केल्याचे महामंडळाकडून कळविण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांचा बांध फुटला. आता मक्याचे काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमाेर निर्माण झाला आहे. मका खरेदी करण्यात न आल्यास ताे केंद्राच्या आवारातच फेकून देऊ, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.