अतुल बुराडे/विष्णू दुनेदार विसोरा/तुळशी (कोकडी)देसाईगंज तालुक्यातील कुरूड हे सर्वात मोठे व प्राचिन परंपरा उत्सव मोठ्या थाटात साजरे करणारे गाव म्हणून ओळखीचे आहे. या गावातील मकरबैल उत्सव विशेष प्रसिध्द असून सदर उत्सव सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी साजरा केला जातो. मागील १०० वर्षांपासून हा उत्सव साजरा केला जात असल्याने पंचक्रोशीत या उत्सवाविषयी विशेष उत्सुकता दिसून येते. कुरूड येथे सुरूवातीला विष्णूपंत ठाकरे पाटील यांच्या पूर्वजांनी १०० वर्षांपूर्वी स्वत:च्या वाड्यातून या उत्सवाची सुरूवात केली. ठाकरे पाटील हे कुरूडचे मालगुजार होते. या उत्सवाला नंतर सामाजिक स्वरूप प्राप्त झाले. कुरूड येथील पाटील मोहल्ल्यातील नागरिकांनी या परंपरेला पुढे जोपासले. आजच्या घडीला पाटील मोहल्ला, झुरे मोहल्ला, पारधी मोहल्ला येथील नागरिक प्रत्येकी एक या प्रमाणे तीन मकरबैलांची गावातून मिरवणूक काढतात. यातून सामाजिक एकतेचे दर्शन घडते. या उत्सवाला पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांची गर्दी काही वर्षांपूर्वी जमत होती. त्या दिवशी या गावाला जत्रेचे स्वरूप प्राप्त होत होते. आज ही गर्दी काही प्रमाणात कमी झाली असली तरी गाव वासीयांमध्ये या उत्सवाप्रती असलेली उत्सुकता व प्रेम तसूभरही कमी झाले नाही. आजही गाववासीय श्रध्दा व भक्तीभावाने मोठ्या जल्लोषात मकरबैलाची मिरवणूक काढतात.गावात वीज नव्हती त्या कालावधीत टेंभे व बत्तीच्या प्रकाशात मकरबैलाची मिरवणूक काढली जात होती. मागील १०० वर्षांपासून कुरूडवासीयांनी ही परंपरा जोपासली आहे, हे विशेष.
१०० वर्षांपासून साजरा होताहे ‘मकरबैल’ उत्सव
By admin | Published: October 12, 2015 1:48 AM